तुटपुंज्या हमीभाववाढीने धान उत्पादक निराश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:06 PM2019-07-04T22:06:29+5:302019-07-04T22:08:21+5:30
शेतमालाचा हमी भावाची घोषणा भारत सरकारने केली असून धानाच्या हमी भावात केवळ ६५ रुपयाने वाढ झाली आहे. हमी भावातील या तुटपूंज्या वाढीने धान उत्पादक प्रचंड निराश झाले आहेत. महागाईच्या काळात लागवड खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने धानाला साधारणत: दोन ते अडीच हजार रुपये हमी भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र धान उत्पादक पट्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतमालाचा हमी भावाची घोषणा भारत सरकारने केली असून धानाच्या हमी भावात केवळ ६५ रुपयाने वाढ झाली आहे. हमी भावातील या तुटपूंज्या वाढीने धान उत्पादक प्रचंड निराश झाले आहेत. महागाईच्या काळात लागवड खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने धानाला साधारणत: दोन ते अडीच हजार रुपये हमी भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र धान उत्पादक पट्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.
भंडारा जिल्हा धान उत्पादक म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. लागवड लायक क्षेत्राच्या ८५ टक्के क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. मात्र नैसर्गिक संकट आणि बाजारमूल्य यामुळे धान उत्पादक गत काही दिवसांपासून कर्जाच्या खाईत लोटले जात आहे. सामान्य धानाला २०१८-१९ मध्ये १७५० रुपये आणि उच्चप्रतीच्या धानला १७७० रुपये हमी भाव होता. आता भारत सरकारने हमी भावाची घोषणा केली. त्यात सामान्य धानाला १८१५ रुपये आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रुपये दर जाहीर केले. दोन्ही धानाच्या हमी भावात केवळ ६५ रुपयांनी वाढ झाली. यामुळे शेतकरी प्रचंड निराश झाले आहे. महागाईच्या काळात लागवड खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकऱ्यांना हमी भावात मोठी वाढ होईल अशी अपेक्षा होती. परंतु घोषीत झालेल्या या भावाने शेतकºयात प्रचंड नाराजी दिसत आहे.
एकरी खर्च १७ हजार , उत्पन्न २० हजार
धानाच्या पिकासाठी शेतकऱ्यांना सरासरी एकरी १७ हजार रुपये खर्च येतो तर एका एकरात पिकलेल्या धानापासून शेतकºयांच्या हाती २० ते २२ हजार रुपये येतात. रोवणीसाठी शेतकऱ्यांना एकरी २ हजार रुपये, ट्रॅक्टरने मशागतीसाठी ३ हजार रुपये, ६००रुपयांचे बियाणे, ५ हजार रुपयांचे रासायनिक खते, दोन हजार रुपयांचे कीटकनाशक, निंदनासाठी एक हजार रुपये खर्च धान कटाईसाठी एकरी अडीच हजार रुपये आणि चुरणा करण्यासाठी दीड हजार रुपये खर्च येतो. तसेच बाजारात धान विक्रीसाठी एकरी एक हजार रुपये खर्च होत आहे. साधारणत: १७ हजार रुपये खर्च एकरी होतो. मात्र १५ ते १७ क्विंटल धान विकल्यास शेतकऱ्यांला २० ते २२ हजार रुये मिळतात. खर्च आणि उत्पन्नाचा हिशेब लावल्यास शेतकऱ्याला काहीही उरत नाही.
मडाईपेक्षा घडाईच जास्त, जिल्ह्यातील मान्यवर व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
शासनाने शेतकºयांची घोर निराशा केली आहे. गत काही वर्षांपासून शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहेत. शासनाने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली.
-नाना पंचबुध्दे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
झालेली वाढ अत्यल्प आहे. ६५ रुपये वाढ करुन शेतकऱ्यांना शासनाने निराश केले आहे. हमीभाव कमी असल्याने खुल्या बाजारात व्यापारी त्यापेक्षा कमी किंमतीत धान खरेदी करतात. त्यातून शेतकऱ्यांची लूट होते. शासनाने यावर पुर्नविचार करण्याची गरज आहे.
-प्रेमसागर गणवीर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
हमी भावाची अल्पवाढ म्हणजे शेतकऱ्यांची शुध्द फसवणूक होय. धानाला अडीच हजार रुपये द्यावा यासाठी सम्राट अशोक सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. हमी भावाच्या अल्प वाढीने शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाईल.
-तुळशीराम गेडाम, अध्यक्ष सम्राट अशोक सेना
शासनाने वास्तविकतेचा विचार करुन भाववाढ करणे अपेक्षीत आहे. खर्चाचा दीड पट उत्पन्नाची हमी देताना धानाचे वाढलेले हमी भाव अपूरे आहे. शेजारी राज्यातील धान उत्पादक आमच्यापेक्षा अधिक नफा कमवितात.
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी भंडारा
वाढलेले हमी भाव म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होय एकीकडे खताचे दर बॅगमागे २०० ते २५० रुपयांनी वाढले आहे आणि हमी भाव केवळ ६५ रुपयांनी वाढले. शेती कशी करावी हा आमच्यापुढे प्रश्न आहे.
-पुंडलीकराव हत्तीमारे, शेतकरी, आसगाव
वाढत्या महागाईच्या तुलनेत धानाचे वाढलेले हमी भाव अत्यल्प आहे. खते, बी-बियाणे मजुरी यांची किंमत बघता धानाला किमान २५०० रुपये प्रती क्विंटल भाव अपेक्षित आहे.
-सुभाष मेश्राम,
शेतकरी, वाकल ता. लाखनी
धान उत्पादक पट्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्या वरिष्ठ स्तरावर मांडून धानाच्या आधारभूत किंमतीत ७०० रुपये दरवाढ करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही रस्त्यावर उतरायला तयार नाही.
-कृष्णाजी पराते,
पालांदूर ता. लाखनी
नव्याने जाहिर झालेल्या शेतमालाच्या हमीभावात धानाची अल्पशी वाढ झाली ंआहे. शासनाने धान उत्पादकाने निराश केला आहे. त्याचा पुर्नविचार होणे आवश्यक आहे.
-मनोहर खंडाईत, कवलेवाडा, ता. लाखनी
हमी भावात दिलेली वाढ म्हणजे शेतकरी वर्गाचा तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांचे परिश्रम समजून घेवून हमीभावात वाढ करायला पाहिजे होती. मात्र आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही.
-पंढरी सेलोकर,
शेतकरी सावरला, ता. पवनी
धान उत्पादकांचा तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असून ६५ रुपये भाव वाढ म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच म्हणावी लागेल.
-मारोती मेंढे, शेतकरी, लोहारा ता. लाखनी
धानाचे हमीभाव आधीच अल्प आहे. त्यात केवळ ६५ रुपये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना २१०० ते २२०० रुपये हमी भाव देण्याची गरज आहे. हमी भावासोबत सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दिले तर मिश्र पीक घेवून शेतकरी आपल्या उत्पन्नात भर घालू शकतात.
-राकेश चोपकर, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
केंद्र सरकारने जाहिर केलेला हमी भाव म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा होय. उत्पादन खर्चाचा विचार करुन किमान २०० रुपये वाढ द्यायला पाहिजे. या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा.
-अशोक राऊत,
शेतकरी इटगाव, ता. पवनी