साकोली उपजिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीने अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:03+5:302021-09-23T04:40:03+5:30
साकोली उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे २१ फेब्रुवारी १९८१ ला मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची ...
साकोली उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे २१ फेब्रुवारी १९८१ ला मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. यामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची इमारत व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान होते. या इमारतीला ४० वर्षांचा कालावधी झाला असून कर्मचाऱ्यांचे निवासस्थान व रुग्णालयाची इमारत ही जीर्ण अवस्थेत आहे. निवासस्थान पडक्या अवस्थेत असल्याने कर्मचारी निवासस्थानात राहत नाही. रुग्णालय परिसरात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी राहत नसल्याने रुग्णांना आवश्यक सेवा मिळत नाही. या जीर्ण इमारतीमध्ये एक्स-रे विभाग, पॅथालॉजी लॅब, औषधी वितरण कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, स्टाफ रूम, प्रयोगशाळा, नेत्र विभाग आदी विभाग कार्यरत होते. हे संपूर्ण विभाग सध्या दुसऱ्या इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना जागा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. हे रुग्णालय तालुका स्तरावर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अपघात व आकस्मिक रुग्णांना नेहमी या उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून रहावे लागते. मात्र वेळेवर वैद्यकीय अधिकारी व स्टॉप नसल्याने रुग्णांना प्रथमोपचार शिवाय भंडाऱ्याला हलविण्यात येते. गत तीन वर्षांपासून जीर्ण इमारत पाडण्याची प्रक्रिया आजही थंडबस्त्यात आहे. तीन वर्षापासून कार्यालयीन पत्रव्यवहार सुरू असून उपभोक्ता विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून इमारत पाडण्याची परवानगी व संयुक्त तपासणी अहवाल सादर न केल्याच्या त्रुटीच्या कारणास्तव जीर्ण इमारत पाडण्यास दिरंगाई होत आहे.