जिल्हा प्रशासनाची दिशाभूल होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:33+5:302021-03-20T04:34:33+5:30
• प्रकरण बोगस चलनाद्वारे कमिशन घोटाळ्याचे लाखांदूर : बोगस चलनाद्वारे राशन दुकानदारांच्या कमिशन घोटाळा केल्याची चर्चा होताच जिल्हा पुरवठा ...
• प्रकरण बोगस चलनाद्वारे कमिशन घोटाळ्याचे
लाखांदूर : बोगस चलनाद्वारे राशन दुकानदारांच्या कमिशन घोटाळा केल्याची चर्चा होताच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश निर्गमित केले. मात्र चौकशी दरम्यान तालुका प्रशासनाकडून राशन दुकानदारांना देण्यात आलेल्या बोगस चलन सादर न केल्यास या सबंध घोटाळा प्रकरणात जिल्हा प्रशासनाची दिशाभूल होण्याची शक्यता पूर्ण चर्चेला उधाण आले आहे.
माहितीनुसार, गत काही महिन्यात तालुका अन्न पुरवठा विभागांतर्गत कार्यरत एका अनधिकृत संगणक परिचालकाने बोगस चलनाद्वारे तालुक्यातील सर्वच ९६ राशन दुकानदारांच्या कमिशनमधून अतिरिक्त रक्कम कपात करुन घोटाळा केल्याचे चर्चेत आले. सदर प्रकरणी येथील अन्न पुरवठा विभागाने तत्काळ दखल घेत घोटाळेबाज अनधिकृत परिचालकाची तडकाफडकी हकालपट्टी देखील केली. मात्र गत अनेक महिन्यात दरमहा कमिशन घोटाळा करुन लाखोने लुबाडणाऱ्या या परिचालकाला अन्न पुरवठा विभागात कामावर कोणी ठेवले? असा सवाल केला जात आहे. कदाचित या घोटाळ्यात अन्न पुरवठा विभागातील काही अधिकारी कर्मचारी तर गुंतले नाहीत ना ! अशी संशयास्पद चर्चा केली जात आहे. सदर घोटाळ्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित होतच तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत या घोटाळा प्रकरणी चौकशी आदेश निर्गमित केले आहे.
सदर आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागांतर्गत येथील तालुका प्रशासनाला वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र सदर निर्देशानुसार तालुका प्रशासनांतर्गत राशन दुकानदारांना देण्यात आलेल्या बोगस चलन जिल्हा पुरवठा विभागाला माहिती अंतर्गत सादर न केल्यास सदर घोटाळा दडपला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बॉक्स :
काय आहे कमिशन घोटाळा
राशन दुकानदारांना अन्न पुरवठा विभागांतर्गत दरमहा धान्य मंजुरी नुसार शासनाला धान्याची किमतीनुसार रकमेचा चलनाद्वारे भरणा करावा लागतो. सदर रक्कम चलनाद्वारे भरताना राशन दुकानदार धान्य विक्री अंतर्गत प्राप्त होणारे कमिशन रक्कम कपात करुन उर्वरित रक्कम चलनाद्वारे भरणा केली जाते. त्यानुसार पॉज मशीनचा वापर करणाऱ्या राशन दुकानदारांना प्रति क़्विंटल ८० रुपये प्रमाणे शासनाकडून कमिशन दिले जाते. तथापि ऑनलाईन चलन भरणा केला जात असल्याने प्रति चलन १५० रुपये अतिरिक्त कमिशन दरमहा दिले जाते. गतवर्षी कोरोना संकट निर्माण झाल्याने तालुक्यातील जवळपास सर्वच ९६ राशन दुकानदारांनी प्रत्यक्ष बँकेत जाऊन चलन भरणा करण्याऐवजी तालुका अन्न पुरवठा विभागात कार्यरत एका अनधिकृत परिचालकाकडून ऑनलाईन चलन भरणा केल्याची ओरड आहे. चलन भरणा करण्यासाठी संबंधित परिचालकाने नियमबाह्य वसुली करुन चलन भरणा केला. मात्र शासनाला भरणा केलेली चलन पावती न देता बोगस चलन देऊन राशन दुकानदारांचे प्रत्येकी ५०० ते १००० रुपये पर्यंत रक्कम कमिशन मधून कपात करुन घोटाळा करीत दरमहा लाखो रुपयाने लुबाडल्याचा आरोप करण्यात आला.
बॉक्स
घोटाळ्याची माहिती मागितली
तालुका अन्न पुरवठा विभागांतर्गत कार्यरत एका अनधिकृत संगणक परिचालकाने बोगस चलनद्वारे घोटाळा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सदर वृत्ताची दखल घेत जिल्हा पुरवठा विभागांतर्गत संबंधित घोटाळा प्रकरणाची तालुका प्रशासनाला एका पत्रान्वये निर्देश देऊन माहिती मागविण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बंसोड यांनी प्रतिनिधीला भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता सांगितले.