तिहेरी लढतीची शक्यता
By admin | Published: October 30, 2016 12:29 AM2016-10-30T00:29:35+5:302016-10-30T00:29:35+5:30
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, भाजपचे परिणय फुके आणि प्रफुल अग्रवाल हे निवडणूक लढणार आहेत.
विधान परिषद निवडणूक : अपक्ष मतदार खाणार ‘भाव’
भंडारा : विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन, भाजपचे परिणय फुके आणि प्रफुल अग्रवाल हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आजघडीला तिहेरी होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीसाठी ३९३ मतदार मतदान करणार असून दोन्ही जिल्हे मिळून १२३ मतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे ११९ तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे १०२ मतदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे. शिवसेनेचे २५, अपक्ष २५ व भाकपचे १ असे पक्षनिहाय मतदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष मतदार ‘भाव’ खाणार आहेत. त्यांना आपल्याकडे खेचण्यात कोण यशस्वी होतो? यावर विजयाचे समिकरण ठरणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारणार
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची अंतिम तारीख २ नोव्हेंबर आहे. शासन राजपत्र २४ नोव्हेंबर २०१५ अन्वये शासनाने १ नोव्हेंबर २०१६ या दिवशी शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शासनाचे उपक्रम, प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांना भाऊबीजनिमित्त सुटी जाहिर केलेली आहे. सदरहू सुटी ही पराक्रम्य संलेख अधिनियम १९८१ खाली जाहिर केलेली नाही. सदर तरतूद विचारात घेता १ नोव्हेंबर रोजीची सुटी ही सार्वजनिक सुटी या व्याख्येत मोडत नसल्याने १ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची कार्यवाही सुरू राहील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)