पवित्र नाते जपण्यासाठी पोस्ट सुटीत देणार सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:56+5:30
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण आहे. बहिण भावाचे नाते अधिक वृद्धींगत करण्यात पोस्ट खात्याचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हा बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला पोस्टाच्या पाकीटातून राखी पाठवायची. मात्र वाहतुकीची सुविधा झाली आणि आधुनिक संवाद माध्यमात पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. परंतु यंदा पुन्हा कोरोना संसर्गाने बहिणींना पोस्टाची आठवण आली.
संतोष जाधवर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण येत्या सोमवारी देशभर साजरा होत आहे. बहिण भावाचे पवित्र नाते जपणाऱ्या या सणाला बहिण आपल्या भावाला नात्याच्या धाग्यात बांधून संरक्षणाची हमी घेते. लॉकडाऊनमुळे बहिण भावापर्यंत पोहचू शकत नसल्याने पोस्टाने खास व्यवस्था करीत सुटीच्या दिवशी अविरत सेवा देण्याचा निर्णय घेतला. शनिवार आणि रविवार या दिवशी पोस्टाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावणार आहेत.
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण आहे. बहिण भावाचे नाते अधिक वृद्धींगत करण्यात पोस्ट खात्याचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हा बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला पोस्टाच्या पाकीटातून राखी पाठवायची. मात्र वाहतुकीची सुविधा झाली आणि आधुनिक संवाद माध्यमात पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. परंतु यंदा पुन्हा कोरोना संसर्गाने बहिणींना पोस्टाची आठवण आली. गत चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. संपूर्ण राज्यात वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. त्यामुळे ना बहिण भावाच्या घरी जाऊ शकत ना भाऊ बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी येऊ शकत. याला काही अपवादही ठरतील. मात्र बहुतांश बहिणींना आपल्या भावाला राखी पोस्टानेच पाठवावी लागणार आहे. हीच अडचण लक्षात घेऊन पोस्टाने रक्षाबंधनाच्या आदले दोन दिवस सुटीचे असतानाही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकींग प्रक्रिया, वितरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवान प्रक्रियेसाठी भंडारा कार्यालयांतर्गत सर्व ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अनेक महिलांनी राखीसाठी बुकींग केल्या आहेत. भावा बहिणीचे नाते जपण्यासाठी यावर्षी पोस्टमन मोलाची भूमिका बजावणार आहे. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला जपणाºया या सणावर कोरोनाचे सावट असले तरी भारतीय डाक विभाग या बहीण-भावांच्या मदतीला धावून आला आहे.
प्रत्येक बहिणीची राखी भावापर्यंत पोहचविण्यासाठी पोस्ट कार्यालय तत्पर आहे. स्पीड पोस्टाद्वारे वितरण होणार असल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या मिळणार आहेत. कोरोना संकटात आम्ही सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेऊन अविरत सेवा देणार आहोत.
-अरविंद गजभिये, सहाय्यक डाक अधीक्षक, भंडारा.
स्पीड पोस्टाचाही घेता येणार लाभ
रक्षाबंधन सणासाठी टपालाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून स्पीड पोस्टाच्या सेवेचा लाभही घेता येणार आहे. स्पीड पोस्टाद्वारे राखीचे वितरण होणार असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागात रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणीत करता येणार आहे. भंडारा जिल्ह्यात कार्यरत ४०० पोस्टमन सुटीच्या दिवशी आपले कर्तव्य पार पाडणार आहेत. भंडाराचे सहाय्यक डाक अधीक्षक अरविंद गजभिये म्हणाले, राखी वितरणासाठी टपालाची विशेष वितरण व्यवस्था तयार करण्यात आली आहे. वर्षानुवर्ष सुरु असलेल्या परंपरेत पोस्टाचा मोठा हातभार आहे. यावर्षी खास राखी पोहचविण्यासाठी आम्ही विशेष सुविधा दिल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी रक्षाबंधनच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून हा सण उत्साहात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.