शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याने शालेय विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:28+5:302021-04-04T04:36:28+5:30
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. ...
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो विद्यार्थी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा देतात. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेता आले नव्हते. त्यामुळे काही निवडक शाळा सोडल्या तर इतर शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे तास घेण्यात आलेले नाहीत. असे असले तरीही अनेक शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेतले होते. त्यातच या परीक्षा पुढे ढकलल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे पालक वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, ही मुदत आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने अनेकांना पुन्हा फॉर्म भरता येणार आहेत.
बॉक्स
असा करावा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे, तसेच या वेबसाइटवर वेळापत्रक, माहिती पुस्तिका, अर्ज उपलब्ध असणार आहेत.
बॉक्स
कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली शिष्यवृत्ती परीक्षा
१) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण विभागाकडून घेतल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. आधी फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे रोजी परीक्षेचा मुहूर्त ठरला आहे.
२) २५ एप्रिल रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे माहिती आहे. त्यातच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने पालकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
३) २३ मे रोजी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. मात्र, पुन्हा ही परीक्षा आणखी पुढे ढकलली तर जाणार नाही ना, असा प्रश्न शाळेचे मुख्याध्यापक व पालकांमधून उपस्थित होत आहे.
कोट
शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यात शासनाची शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यामुळे शाळेतून अधिकाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले पाहिजेत व तयारीही झाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील आम्ही शाळेतर्फे मार्गदर्शन करीत आहोत.
आर. एस. बारई, मुख्याध्यापक.
नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा.
कोट
शिष्यवृत्ती परीक्षेचा विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी खूप फायदा होतो. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसह इतर सर्वच परीक्षांसाठी आम्ही सर्व शिक्षक प्रोत्साहन देतो. यासोबतच परीक्षेची विद्यार्थ्यांची ऑनलाइन तयारीही करून घेत आहोत.
बाळासाहेब मुंडे, सहायक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा, वरठी.