३७ गावांत संभाव्य पाणीटंचाई
By admin | Published: March 28, 2016 12:28 AM2016-03-28T00:28:41+5:302016-03-28T00:28:41+5:30
यावर्षी पावसाळ्यात अपुरा पाऊस आला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
साकोली तालुक्यातील गावे : पंचायत समितीत एप्रिल ते जूनपर्यंत उपाययोजनांचा आराखडा तयार
संजय साठवणे साकोली
यावर्षी पावसाळ्यात अपुरा पाऊस आला. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे साकोली तालुक्यात यावर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यात ३७ गावात संभाव्य पाणीटंचाई भासू शकते. यासाठी प्रशासनातर्फे आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासन या पाणी टंचाईवर खरोखरच मात करू शकेल काय?
पंचायत समिती साकोली अंतर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यासाठी संभाव्य पाणीटंचाई म्हणून ३७ गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
यात विहिरीचे खोलीकरण व गाळ काढणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरी घेणे यासारख्या सोयींची तरतूद करण्यात आली असून यात बाम्हणी, बांपेवाडा, बरडकिन्ही, बोंडे, बोळदे, सालई, सुंदरी, एकोडी, घानोड, गिरोला, गुढरी, जांभळी सडक, किन्ही मोखे, लवारी, महालगाव, मुंडीपार, पळसगाव सोनका, पळसपाणी, निप्परटोला, परसटोला, परसोडी, पिंडकेपार, साखरा, सेंदूरवाफा, सानगडी, सासरा, सातलवाडा, सावरबंध, शिवणीबांध, सोनपुरी, सुकळी, उमरी, उसगाव, आतेगाव, विर्शी, विहिरगाव व वडद या ३७ गावाचा समावेश आहे. या गावात उपाययोजना आराखडा व तयार करण्यात आला असला तरी मार्च महिना संपत आहे.
मात्र तालुक्यातील एकाही गावात कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील ३७ गावांमध्ये उदभवलेल्या पाणीटंचाईवर प्रशासन मात करण्यात यशस्वी होईल काय असा सवाल आहे.
जलशुद्धीकरण योजनाही बंदच
मोठा गाजावाजा करीत १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा होणार म्हणून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून साकोली येथे जलशुद्धीकरण योजना तयार केली. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही योजनाही मागील दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे साकोलीला जुन्याच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरु आहे.
वसुलीचाही फटका पाणीटंचाईवर
यावर्षी पावसाअभावी शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. एकंदरीत शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आसहे. त्यामुळे पाणीपट्टीकर व घरकर वसुलीत अडसर निर्माण होत आहे. किडे पाणीपट्टीकर वसुल होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत विद्युत बिल भरण्यास असमर्थ आहे. त्यामुळे बिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी विद्युत पुरवठा खंडीत करते. याचाही फटका पाणी टंचाईवर बसत आहे.
तलाव कोरडे
यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आल्याने तालुक्यातील तलाव, बोड्या यात पाण्याचा अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी माणसासहीत जनावरांनाही पिण्यासाठी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
पाण्याची पातळी खोल गेली
यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे पाणी जमिनीत मुरले नाही तर शेतीसाठी शेतकऱ्यांनी पावसाळ्यात व आता उन्हाळी धानपिकासाठी रात्रंदिवस विहीर व बोअरवेल मधून पाण्याचा उपसा करीत आहेत. पाण्याची पातळी घटली असून याचाही फटका नक्कीच पाणीटंचाईवर बसणार आहे.
प्रकल्पाचा उपयोग नाही
साकोली जवळील कुंभली येथील निम्नचुलबंद प्रकल्पाला २० वर्षापेक्षा अधिक वर्षे लोटली. मात्र या प्रकल्पाचे बरेच काम बाकी असून याही प्रकल्पाचा उपयोग ना शेतीसाठी ना पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे.