मुख्य डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:13+5:302021-07-05T04:22:13+5:30
मुरमाडी येथील प्रकार लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग ते ...
मुरमाडी येथील प्रकार
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग ते मुरमाडी ग्रामपंचायतीपर्यंत गावात जाण्याच्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याचे डांबरीकरण होऊन अनेक वर्षे झालेली आहेत. डांबरी रस्त्यावर खड्डे पडलेले असून रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला पाणी साचत असते. ग्रामपंचायतीने डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीने भरले असल्याचे दिसून येत आहे. डांबरी रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविल्याने पावसामुळे खड्ड्यातील माती रस्त्यावर येत असल्याने रस्ते चिखलाने व घाणीने माखलेले दिसून येतात.
मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतीचा परिसर लाखनी शहराला लागून आहे. त्यामुळे मुरमाडीतील वस्ती वाढलेली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ७५३६ मुरमाडीची लोकसंख्या होती. ती २०२१ ला १० हजाराच्या वर गेलेली आहे. नवीन कॉलन्या तयार झालेल्या आहेत. नागरी ग्रामपंचायत म्हणून मुरमाडी येथे अनेक शासकीय योजना मंजूर होत असतात. मुरमाडी ग्रामपंचायतीचा ३५ लाख रुपयांच्या वर गृहकर लोकांकडून गोळा होत असतो. मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून ठेकेदारी करून तुंबडी भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध योजनांतून थातुरमातूर काम करून देयके उचलली जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.