चक्रीवादळामुळे कुक्कुटपालन शेड भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2015 12:44 AM2015-04-20T00:44:22+5:302015-04-20T00:44:22+5:30
केसलवाडा येथील मारोती धर्मा रामटेके यांचे शेतीमध्ये असलेल्या कुक्कुटपालनाचे शेड चक्रीवादळामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले.
सात लाखांचे नुकसान : केसलवाडा येथील घटना
भंडारा : केसलवाडा येथील मारोती धर्मा रामटेके यांचे शेतीमध्ये असलेल्या कुक्कुटपालनाचे शेड चक्रीवादळामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले. यात कोंबडीचे पिलूसुद्धा मृत पावले. त्यात त्यांचे ७ लाख ११ हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.
शुक्रवारी मध्यरात्री अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे ही हाणी झाली आहे. त्याठिकाणी असलेले मारोती रामटेके हे थोडक्यात बचावल्याने जीवित हानी टळली. नागसेन रामटेके यांनी हा व्यवसाय बँकेचे कर्ज घेऊन उभारलेला होता.
चक्रीवादळामुळे कुक्कुटपालन शेड पूर्णपणे पडल्याने कोंबडीचे पिल्लू मरण पावले. सदर घटनेचा पंचनामा चिखली सा.क्र. चार येथील तलाठी व्ही. ए. सयाम यांनी केला आहे. चक्रीवादळामुळे ७ लाख ११ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने सदर कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.
ही घटना नैसर्गिक आपत्तीमुळे घडली आहे. त्यामुळे शासनाने कुक्कुटपालन व्यावसायिकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मारोती रामटेके, नागसेन रामटेके तसेच त्यांचे कुटुंबीयांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने नेटचे नुकसान
मोहदुरा : मागील आठवड्यात आलेल्या अकाली पावसाने व वादळ वाऱ्याने शेडनेटचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रसत आहे. मोहदुरा येथील बाळकृष्ण भोंदे यांनी परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरली व त्यानुसार बँकेतून कर्ज काढून शेडनेट शेती करण्याचे ठरविले. मागील वर्षीच शेडनेट लावून त्यामध्ये वांगे, टमाटर, भेंडी यासारखे पीक लावले. भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा ऐन मोक्यावर अकाली पावसाने व वादळ वाऱ्याने शेडनेटचे मोठे नुकसान झाले. शेडनेट पूर्णत: क्षतिग्रस्त झाले आहे. हातात आलेले पिकाचे यामूळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्या शेतकऱ्यावर फार मोठे संकट ओढवले हे मात्र नक्की. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.