ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:03 PM2024-05-06T16:03:58+5:302024-05-06T16:05:32+5:30

सिंचन करताना अडचणी: महावितरण विरोधात शेतकऱ्यांत रोष

Power outage in rural areas, heavy loss of vegetable crops | ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

Power outage in rural areas

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणी देताना अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी वर्गात महावितरणविरोधात रोष व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. सध्या भाजीपाल्याला भाव चांगला आहे. आगामी दिवसांमध्ये भाजीपाल्याचे भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी दिवसरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, धारगाव क्षेत्रात तासनतास भारनियमन करण्यात येत आहे. सध्या भंडारा तालुक्यात ४२ डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे. या तापमानात पिके सुकत आहे. मात्र, यावेळीच भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणने वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


गावांमध्येही वीजपुरवठा खंडित
गावांमध्ये सध्या विजेची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. दररोज खंडित वीज पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या कडक उन्हाळा चालू असून, विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना बऱ्याच वेळा रात्र अंधारात काढावी लागत आहे. वीज सतत खंडित होत असल्यामुळे वृद्ध व्यक्त्ती, लहान मुले यांना फार त्रास होत आहे. ते नीट झोपतही नाहीत. उन्हाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.


शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष
अनेक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपली व्यथा सांगत नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

धारगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. त्याकरिता हजारो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित राहत असल्याने पिके सुकत आहे. परिणामी वाढत्या भावाचा फायदा होत नसून, लागवडीचा खर्चही व्यर्थ जात आहे.
- धनराज कायते, शेतकरी

Web Title: Power outage in rural areas, heavy loss of vegetable crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.