कोहलगाव, रामपुरी परिसरात विजेचा लंपडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:20+5:302021-04-12T04:33:20+5:30
अर्जुनी-मोरगाव : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व अतिदुर्गम भाग असलेल्या कोहलगाव, रामपुरी व अन्य दहा-पंधरा गावांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून विजेचा लंपडाव ...
अर्जुनी-मोरगाव : आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व अतिदुर्गम भाग असलेल्या कोहलगाव, रामपुरी व अन्य दहा-पंधरा गावांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून विजेचा लंपडाव सुरू आहे. घरगुती वापरासह शेती व लघु उद्योगावर याचा मोठा परिणाम होत आहे. वीजपुरवठा नियमित सुरू राहावा, यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील अनेक गावच्या सरपंचांसह शिष्टमंडळाने वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता फुलझेले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. ग्रामपंचायत कोहलगाव अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तसेच या परिसरातील अन्य ग्रामपंचायतींच्या परिसरातील गावांमध्ये विजेची समस्या गंभीर बनली आहे. वारंवार वीज गुल होणे तसेच विजेच्या कमी दाबामुळे घरगुती दिवे, पंखे, कुलर व घरगुती पाण्याच्या मोटारी अजिबात चालत नाहीत. विजेच्या अशा लपंडावामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे निकामी झाली आहेत. तसेच रामपुरी पाणीपुरवठा योजना ही परिसरातील पंधरा-वीस गावांमध्ये पाणी पुरवणारी योजना आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.