सत्तेसाठी घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:21 PM2018-01-13T22:21:38+5:302018-01-13T22:22:59+5:30
पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत भाजप व काँग्रेसला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता सोमवारला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपद निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य भ्रमंतीवर असून काँग्रेसचे सदस्य मात्र दोन गटात विखुरले आहेत. या सर्व घडामोडीवर भाजप बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेस -राष्ट्रवादीने आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. यावेळी या सत्तांतर करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु नाना पटोले यांनी खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील समिकरणे बदलत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत अडीच वर्षापूर्वी समसमान जागांचे वाटप करून आघाडी केली होती. तशीच आघाडी सोमवारला होण्याची शक्यता आहे. परंतु आताच्या अडीच वर्षाच्या कालावधीत अध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्षे असे विभागून देण्यात यावे, असे मत माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केले आहे. तर यावेळी अध्यक्ष हा पुरूष असावा असे पक्षश्रेष्ठीला वाटत असल्यामुळे यावर रविवारला नागपुरात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता बसणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
काँग्रेस दोन गटात तरीही एकत्रच
एक दिवसावर आलेल्या या निवडणुकीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपचे सदस्य सद्यस्थितीत भ्रमंतीवर आहेत. परंतु काँग्रेसचे दोन गट वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काँग्रेसच्या एका गटात ११ सदस्य तर दुसºया गटात आठ पक्षीय सदस्यांसह तीन अपक्ष सदस्य आहेत. काँग्रेसचे १९ सदस्य असताना हे संख्याबळ आता २२ झाले आहे. हे दोन्ही गट भ्रमंती करून सध्या विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या दोन्ही गटाच्या नेत्यांच्या रविवारला भेटीगाठीनंतर अध्यक्षपदाचा उमेदवार आणि सभापतीपद यावर एकमत करतील आणि सर्व मिळून सोमवारला मतदानासाठी येणार आहेत.
भाजपच्या गटात दोन सदस्य अनुपस्थित
जिल्हा परिषदेत भाजपचे १३ सदस्य आहेत. भाजपचे सदस्यही भ्रमंतीवर गेले असून त्यात दोन सदस्य अनुपस्थित आहेत. त्यात नाना पटोले यांचे विश्वासू मानले जाणाऱ्या दोघांचा समावेश असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही सदस्य काँग्रेसच्या बाजुने राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे संख्याबळ दोनने वाढले
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे १५ सदस्य आहेत. हे सर्व सदस्य शनिवारला भ्रमंतीसाठी निघाले असून त्यांच्यासोबत एक अपक्ष सदस्य आणि एक शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे संख्याबळ दोनने वाढून १७ झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली तर एकूण संख्याबळ २२ अधिक १७ अशी ३९ ईतकी होते.