जिल्ह्यातील ३४८६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:38+5:302021-02-27T04:47:38+5:30
कोरोना संसर्गाच्या काळात अनेक ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याची ...
कोरोना संसर्गाच्या काळात अनेक ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केला नाही. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल आल्याची ओरड होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु, वीज बिलात दुरुस्ती झाली नाही. दुसरीकडे राजकीय पक्षांनी वीज बिल माफीसाठी आंदोलने केली. परिणामी जिल्ह्यातील दोन लाख ८६ हजार २९८ ग्राहकांपैकी ९७ हजार ५२२ ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. त्यांच्याकडे महावितरणची २३ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. आता गत १५ दिवसांपासून महावितरणने वीज बिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करणे सुरू केले आहे.
भंडारा जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांची संख्या दोन लाख ६७ हजार ५८० असून, त्यापैकी ८९ हजार ४१३ ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे १८ कोटी २५ लाख रुपये थकबाकी आहे. यापैकी वीज विरतणने ३०८५ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. जिल्ह्यात वाणिज्य ग्राहकांची संख्या १५ हजार ४३० असून, त्यापैकी ६७०९ ग्राहकांकडे दोन कोटी ९९ लाख रुपये थकबाकी आहे. ३५० वाणिज्य ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. जिल्ह्यात ३२८८ औद्योगिक ग्राहक असून, १४०० ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यापैकी ५१ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
बॉक्स
वीज खंडित होताच बिलांचा भरणा
थकीत बिल असलेल्या ग्राहकांचा महावितरणने वारंवार सूचना दिल्यानंतरही ग्राहक वीज बिल भरत नव्हते. मात्र, वीज पुरवठा खंडित केल्याबराेबर एक-दोन दिवसांतच थकीत बिलाचा भरणा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वीज ही जीवनावश्यक असून, वीज नसेल तर घरात राहणेही कठीण होते. त्यामुळेच वीज पुरवठा खंडित होताच ग्राहक बिलाचा पैसा भरत असल्याचा अनुभव जिल्ह्यात येत आहे.
बॉक्स
कर्ज घेऊन वीज बिलाचा भरणा
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल आले. थकीत बिलावर व्याज वाढत गेल्याने आकडा फुगत गेला. दुसरीकडे वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित करणे सुरू केले. त्यामुळे ग्राहकांना नाइलाजाने वीज बिल भरावे लागत आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती मोठे बिल भरण्याची नसल्याने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. तुमसर येथील एका ग्राहकाला ३५ हजारांचे बिल आले. त्यासाठी कर्ज घेऊन विजेचा भरणा केल्याची माहिती आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही ग्राहकांची आहे.
बॉक्स
वीज कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना
कोरोना महामारीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या घरचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी पोहोचताच ग्राहक संतप्त होतात. कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकारही घडत आहे. गत १५ दिवसांत जिल्ह्यात अशा १० ते १२ घटना घडल्या असून, यामुळे वीज वितरणचे कर्मचारीही धास्तावले आहेत. अनेक प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असली तरी वीज पुरवठा तोडण्यासाठी गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.
बॉक्स
जिल्ह्यातील थकबाकीदार ग्राहकांची संख्या
प्रकार थकबाकीदार खंडित वीज पुरवठा रक्कम
घरगुती ८९४१३ ३०८५ एक कोटी ३७ लाख
वाणिज्य ६७०९ ३५० २९ लाख
औद्योगिक १४०० ५१ २२ लाख
एकूण ९७५२२ ३४८६ एक कोटी ८८ लाख
कोट
ग्राहकांनी थकीत बिलाचा त्वरित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे. कोणतीही तक्रार असल्यास जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. अप्रिय कारवाई टाळावी.
-राजेश नाईक, अधीक्षक अभियंता वीज विरतण.