तारांवर आकडे टाकून कृषीपंपासाठी वीज चोरी; सहा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 04:28 PM2022-04-27T16:28:08+5:302022-04-27T16:28:43+5:30
विरली मंडलांतर्गत सहा शेतकऱ्यांनी उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे पुढे आले.
लाखांदूर (भंडारा) : तारांवर आकडे टाकून घरगुती वीज चोरीचे प्रकार जिल्ह्यात नवीन नाहीत. मात्र, आता चक्क कृषीपंपासाठी वीज चोरी आणि तीही उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून करण्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील विरली मंडलात उघडकीस आला. याप्रकरणी सहा शेतकऱ्यांना ३६ हजार १२० रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
लाखांदूर तालुक्यात विविध क्षेत्रात सात हजार अधिकृत कृषिपंपाना वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, विरली मंडलात काही शेतकरी कृषीपंपासाठी वीज चोरी करीत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून मंगळवारी वीज कर्मचाऱ्यांनी शोध माेहीम राबविली. त्यावेळी विरली मंडलांतर्गत सहा शेतकऱ्यांनी उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे पुढे आले.
वीज चोरीसाठी वापरलेल्या वायरसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांवर ३६ हजार १२० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडाच्या रकमेचा भरणा तीन दिवसांत न केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.