सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:49 PM2018-12-15T21:49:36+5:302018-12-15T21:49:51+5:30
महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सामर्थ्याचे दुसरे नाव म्हणजे महात्मा गांधी होय असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी येथे केले.
उच्च तंत्र व शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ जत्रा कार्यक्रमात ते ‘गांधी जीवन व विचार’ या विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाच्या सहाय्यक ग्रंथपाल डॉ.पूजा दाढे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, नागपूर येथील गांधी विचारवंत सुनील पाटील उपस्थित होते. चंद्रकांत वानखेडे यांनी गांधीजींच्या जीवनाचा आढावा घेत स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे महत्व विशद केले. ते म्हणाले, गांधीजींच्या आगमनानंतर स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य सहभागी झाले.
आजही जगभरातील नेत्यांचे महात्मा गांधी आदर्श आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेलांनी गांधीजींच्या विचारावर क्रांती केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, मी गांधीमुळेच अमेरिकेचा अध्यक्ष झालो. गांधींजी महती संपूर्ण जगाला पटली. परंतु आपण खऱ्या अर्थाने गांधी समजूनच घेतला नाही. गांधींचे तत्वज्ञान भेकड तत्वज्ञान असल्याचे आपल्यावर बिंबवले गेले. परंतु शस्त्राची भाषा करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही हे १८५७ च्या उठावातून सिद्ध झाले होते. त्यामुळेच महात्मा गांधींनी सर्वसामान्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून देश स्वातंत्र्य केला. असे ते म्हणाले.
महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या प्रवाहात आणले. हे काही मुठभर लोकांना पटले नाही. त्यातूनच गांधींची हत्या झाल्याचे सांगत वानखेडे म्हणाले, गांधी कोणाच्या मारल्याने मरणार नाही. चांगुलपणाला जोपर्यंत मरण नाही तोपर्यंत गांधी मरणार नाही.
सत्य, अहिंसा ही मूल्य आहेत तोपर्यंत गांधींचे विचार मरणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुनील पाटील व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले. यावेळी ग्रंथपे्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्याख्यानानंतर ‘गुगल तो सहाय्यक है, पुस्तकही नायक है’ यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती.
कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे गं्रंथपाल डॉ.दीपक कापडे, नागपुरच्या कला वाणिज्य नाईट कॉलेजचे ग्रंथपाल डॉ.अशोक खोब्रागडे, समर्थ महाविद्यालय लाखनीचे ग्रंथपाल डॉ.धनंजय गभणे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनीचे ग्रंथपाल डॉ.संजय रायबोले यांनी यात सहभाग घेतला. यावेळी पुस्तक किती महत्वाचे आहे यावर मंथन करण्यात आले.