फुले शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:00+5:302021-08-19T04:39:00+5:30
मोहाडी : मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूलच्या शाळेत ‘एक कदम आगे’ या उपक्रमांतर्गत दहावीची सराव परीक्षा सुरू ...
मोहाडी : मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूलच्या शाळेत ‘एक कदम आगे’ या उपक्रमांतर्गत दहावीची सराव परीक्षा सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांनी क्रियाशील व्हावे, अभ्यास करण्याचा वेग वाढवावा या हेतूने महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी शाळेने दहावीची पहिली सराव परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू केली आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. वास्तविक अध्यापनाला सुरुवात झाली आहे. कोविड-१९चा प्रभाव कमी झाला आहे. तथापि, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ग्रामीण भागातील सुरू असलेल्या शाळा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळा बंद झाल्या, विद्यार्थी घरी राहिले तर फेस-टू-फेस अध्यापन होणार नाही. ऑनलाईन शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अवघड होईल ही भीती आहेच. या सगळ्या भविष्यात येणाऱ्या अडचणी आताच दूर करण्यासाठी ‘एक कदम आगे’ अशी टॅगलाइन वापरून त्यावर कार्य करणे शाळेने सुरू केल्याचे मुख्याध्यापक राजू बांते यांनी सांगितले. पटावर असलेल्या ५९ पैकी ५० विद्यार्थ्यांनी परीक्षाप्रमुखांकडे नावनोंदणी केली आहे. यात १६ दत्तक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पहिल्याच सत्रात दहावीची सराव परीक्षा सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदित आहेत.
बॉक्स
कोविड नियमांचे पालन
परीक्षा देताना कोविड नियमांचे पालन केले जात आहे. एका वर्गात २० विद्यार्थी व एका डेस्कवर एक विद्यार्थी बसविला जात आहे. आजारी मुलांना शाळेत बोलावण्यात येत नाही.
कोट
विद्यार्थ्यांच्या ज्ञान व क्रियात्मक गुणवत्तेचे मोजमाप केले जावे. गुणवत्तेत कोणत्या कमतरता आहेत, त्यांचा शोध व सुधारणा करण्यासाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
हंसराज भडके, परीक्षाप्रमुख
कोट
सराव परीक्षेने अभ्यासाची गती वाढली. आत्मविश्वास निर्माण व्हायला मदत झाली. पुढील परीक्षेचे दडपण कमी व्हायला मदत होणार आहे. सोबत गुणवत्ता वाढीस लागणार आहे.
राजश्री बुधे, विद्यार्थिनी
180821\img_20210817_144801.jpg
'एक कदम आगे ' दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा
फुले शाळेचा उपक्रम : ५० विद्यार्थी सहभागी