पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शनांतर्गत सराव परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:36 AM2021-01-25T04:36:05+5:302021-01-25T04:36:05+5:30
लाखांदूर पोलीस विभागांतर्गत येथील ठाणेदार मनोहर कोरेटी, सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस उपनिरीक्षक संदीप ...
लाखांदूर पोलीस विभागांतर्गत येथील ठाणेदार मनोहर कोरेटी, सहायक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम अमोल कोकाटे, पोलीस नाईक दुर्योधन वकेकार व पोलीस अंमलदार मनीष चव्हाण यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात गत काही दिवसांपासून मोफत भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर घेतले जात आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून नियमित कर्तव्यक्षम राहतानाच समाजातील बेरोजगार युवकांना प्रशासकीय सेवेची प्रेरणा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोफत उपक्रमाचे तालुक्यात सर्वदूर कौतुक केले जात आहे.
दरम्यान, या उपक्रमांतर्गत मागील काही महिन्यांपासून मार्गदर्शन शिबिरांतर्गत उपस्थित शिबिरार्थी विद्यार्थी युवकांना विविध विषयांचे मार्गदर्शन केले जात आहे. त्यानुसार रविवार, २४ जानेवारी रोजी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला तालुक्यातील शेकडो शिबिरार्थी व युवकांनी हजेरी लावली होती. यावेळी परीक्षार्थी विद्यार्थी युवकांचा तात्काळ निकालदेखील जाहीर करण्यात आला असून शिबिरार्थी युवकांनी समाधानकारक यश संपादित केल्याने सर्वत्र उत्साह दिसून येत होता.