प्रधानमंत्री श्रमवीर पुरस्काराने प्रमोद नागदेवे सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:13 PM2018-02-27T23:13:28+5:302018-02-27T23:13:28+5:30
उत्पादन कार्यात विशेष कामगिरी, अभिनव क्षमता व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अशोक लेलँडचे प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांच्या हस्ते पंतप्रधान श्रमवीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : उत्पादन कार्यात विशेष कामगिरी, अभिनव क्षमता व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अशोक लेलँडचे प्रमोद हरिश्चंद्र नागदेवे यांना उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांच्या हस्ते पंतप्रधान श्रमवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दिल्ली येथील विज्ञान भवनात पुरस्कार वितरण सोहळा सोमवारला पार पडला.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार, आर्थिक सल्लागार देवेंद्र सिंग व कामगार सचिव सत्यवती या उपस्थित होत्या.
नाशिकनगर येथील निवासी प्रमोद नागदेवे यांना २००८ मध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईतर्फे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांना मिळालेला हा पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील पहिला पुरस्कार आहे. पंतप्रधान श्रमवीर पुरस्कार हा माझा नसून माझ्या कंपनीचा गौरव असल्याची प्रतिक्रिया प्रमोद नागदेवे यांनी दिली. दिल्ली येथील कार्यक्रमाला कंपनीचे मुख्य व्यवस्थापक एम.एन. लखोटे, गेयर लाईनचे व्यवस्थापक एन.सी. यादव व प्रेक्षा नागदेवे उपस्थित होते.