नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण
By Admin | Published: January 18, 2017 12:20 AM2017-01-18T00:20:46+5:302017-01-18T00:20:46+5:30
मकरसंक्रांतीनिमित्त पतंग मोठ्या प्रमाणात उडविण्यात येते. यासाठी चायना मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची विक्री होत आहे.
चायना मांजा : मोठा बाजार परिसरातील घटना
भंडारा : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग मोठ्या प्रमाणात उडविण्यात येते. यासाठी चायना मांजावर बंदी असतानाही शहरात त्याची विक्री होत आहे. या मांजामुळे एका शिक्षकाचे नशिब बलवत्तर असल्याने प्राण वाचले. हा प्रकार शहरातील मोठा बाजार परिसरात घडला.
शहरातील संत कबीर वॉर्डातील राजेश कृष्णराव निंबार्ते हे खरबी येथील विकास हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. सोमवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने भावाच्या लहान मुलाला शाळेत सोडून देण्यासाठी निघाले होते. दरम्यान सकाळच्या सुमारास पतंग उडविण्याचा प्रकार सुरू होता. चायना मांजावर शासनाने बंदी घातलेली असतानाही या मांजाच्या सहायाने पतंग उडविल्या जात होते. दरम्यान मोठा बाजार परिसरातून जात असताना अचानक त्यांच्या मानेला या मांजाने स्पर्श केला. मानेला काहीतरी लागल्याचा भास झाल्याने त्यांनी डाव्या हाताच्या आंगठ्याने तो काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या अंगठ्याला व गळ्याला मांजामुळे इजा झाली. समयसुचकतेने त्यांनी वाहन थांबविले व बघितले असता चायना मांजाने त्यांच्या गळ्याला इजा झाल्याने रक्त निघाले. दरम्यान त्यांनी तातडीने डॉक्टरकडे जावून प्रथमोपचार केले.
शासनाच्या वतीने चायना मांजावर बंदी घातली असतानाही शहरात त्याची विक्री होत असल्याचे यावरून सिद्ध होते. राजेश यांचे नशिब बलवत्तर असल्यानेच मोठी दुर्घटना टळली. मात्र अशा मांजा व्रिकेत्यांवर प्रशासन व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (शहर प्रतिनिधी)