भंडारा शहरात सहा केंद्रांवर रविवारी होणार एमपीएससीची पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:35 AM2021-03-20T04:35:09+5:302021-03-20T04:35:09+5:30

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा रद्द करून ...

Pre-examination for MPSC will be held on Sunday at six centers in Bhandara city | भंडारा शहरात सहा केंद्रांवर रविवारी होणार एमपीएससीची पूर्व परीक्षा

भंडारा शहरात सहा केंद्रांवर रविवारी होणार एमपीएससीची पूर्व परीक्षा

Next

भंडारा : राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा रद्द करून आता नव्याने ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. या परीक्षेची भंडारा जिल्ह्यात सहा केंद्र असून, जिल्ह्यातील २१०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मात्र, याच दिवशी रेल्वेचीही परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी एकच परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय स्तरावर होणाऱ्या रेल्वे परीक्षेची तारीख आधीच जाहीर झाली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी ) कोरोना पार्श्वभूमीवर अनेकदा तारीख बदलल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तरीही विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला होता.

१४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताच संपूर्ण राज्यभरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवला होता. काही ठिकाणी परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपला राग व्यक्त केला होता. त्यामुळे याची दखल घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कालावधीतच एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख २१ मार्च रोजी जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, यापुढे एमपीएससीने ठरलेल्या नियोजनानुसारच परीक्षा घ्याव्यात, अशी मागणीही विद्यार्थ्यांमधून होत आहे. यासोबतच रेल्वेची परीक्षा देता येत नसल्यानेही काही विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कोट अधिकारी

एमपीएससी परीक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या स्टाफची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्र सॅनिटायझर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी प्रवेश देताना प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग, टेम्परेचर मोजूनच प्रवेश दिला जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान जास्त असल्यास त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार आहे. यासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

शिवराज पडोळे,

निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा.

कोट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी घरी राहूनही करता येते. एमपीएससीची परीक्षा राज्य स्तरावर होत असल्याने यूपीएससीच्या तुलनेत परीक्षार्थी व लागणारा स्टाफही जास्त असतो. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर अनेक वेळा ही परीक्षा रद्द करण्यात आली. जिल्हास्तरावरच परीक्षा केंद्र असल्याने परीक्षार्थींसाठी फायदेशीर आहे. माझी तयारी सुरु असून, आत्मविश्वासपूर्वक २१ मार्च रोजी परीक्षा देणार आहे.

दीपक आहेर, परीक्षार्थी तथा मंडल कृषी अधिकारी, भंडारा

कोट

नोकरी करीत असल्याने मिळेल त्या वेळेत अभ्यास केला. कोरोना पार्श्वभूमीवर पुस्तके व अन्य मार्गदर्शनासाठी गेल्या काही दिवसात मर्यादा आली. मात्र, भंडारा शहरातही नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षेची अनेक जण तयारी करतात. यामुळे चर्चेतून समस्या सोडवतो. एमपीएससीने परीक्षेचे एकदा जाहीर केलेले टाईमटेबल वारंवार बदलता कामा नये, यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची फजिती होते.

रेणुका दराडे, परीक्षार्थी, भंडारा.

कोट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा या २१ मार्च रोजी एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनाची कोणती परीक्षा द्यायची यावरून घालमेल होत आहे. मी एमपीएससीचीच परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

निरोप धारगावे, परीक्षार्थी.

बॉक्स

परीक्षेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार, २१ मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे तपासणी अहवाल पाहूनच त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय विविध परीक्षा केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व कोरोना संसर्गाच्या सुरक्षेची अन्य साधने पुरविली जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांबाबत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

बॉक्स

विविध कारणांमुळे किती वेळा परीक्षा रद्द झाली

१ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणाऱ्या विविध पदांची राज्यसेवा पूर्व परीक्षा आतापर्यंत तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलली आहे. आता २१ मार्च रविवार रोजी होत असलेल्या जिल्ह्यात सहा परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे थर्मल स्कॅनिंग होणार आहे. त्यामुळे शरीराचे तापमान समजले जाणार आहे. थर्मल स्कॅनिंग दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान जास्त आढळून आल्यास त्याला स्वतंत्र बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

२ वारंवार रद्द होणारी एमपीएससीची पूर्वपरीक्षा आता अखेर २१ मार्च रोजी होत असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

३ अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ घेतलेल्या निर्णयाचे स्वागतदेखील केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरसारख्या ठिकाणी जावे लागत नसल्याने जिल्ह्यातील परीक्षार्थींनी एकीकडे तयारी पूर्ण केली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातच परीक्षा होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Pre-examination for MPSC will be held on Sunday at six centers in Bhandara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.