जिल्ह्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 05:00 AM2020-06-03T05:00:00+5:302020-06-03T05:01:07+5:30
हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवार रात्री ते मंगळवारी सकाळपाळीत पावसाने सर्वदूर हजेरी लावली. यात उन्हाळी धानपिकासह भाजीपाला पीक संकटात सापडले आहे. परिणामी बळीराजाचे टेंशन अजून वाढले आहे.
हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान खरेदी केंद्रांवर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेला धान ओला झाला आहे. दुसरीकडे भाजीपाला पिकांची लागवड केलेल्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. कठाण पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.
पालांदूर जवळील वाकल येथे वीज खांबावर वीज कोसळल्याने इन्सूलेटर व तार तुटले. यामुळे तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. पालांदूर परिसरातील गावे अंधारात होती. तसेच धानाची मळणी व कापणी केल्यासह धान खरेदी केंद्रावर आणलेला धान या पाण्यामुळे ओला झाला. मेंगापूर धान खरेदी केंद्रावर हे दृष्य बळीराजाला चिंतेत घालणारे होते.
लाखांदूर तालुक्यात उन्हाळी धानपिकासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली होती. जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली. धान कापणीला व मळणीला वेग आला असतानाच रोहिणी नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे धानपिक जमीनदोस्त झाले. धानपिकावर पाणी गेल्याने धानाची पोत खराब होऊन खुल्या बाजारात धानाचे भाव गडगडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरडवाहू शेतकऱ्यांना या पावसाचा हंगामपूर्व व मशागतीसाठी पिकाला फायदा होणार असला तरी उन्हाळी धान उत्पादकांसाठी मारक ठरला आहे.
ग्रामीण क्षेत्रातही दमदार हजेरी
सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना चिंतेत घातले आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात विजांच्या कडकडाटसह पाऊस बरसला. पवनीत सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसल्या. मोहाडी सह ग्रामीण क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली. लाखनी शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने शहरात मात्र तितका परिणाम जाणवला नाही. करडी परिसरात पाऊस बरसला असून याचा रोहयो कामावर परिणाम जाणवला. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून तलावात पाणी साचले आहे. आसगाव परिसरातही मुसळधार पाऊस बरसला.