पालांदूर पोलीस स्थानकअंतर्गत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:55+5:302021-02-10T04:35:55+5:30
महाराष्ट्र शासनाने सुमारे बारा हजार पाचशे एवढे जम्बो पोलीस भरती करण्याचे जाहीर केले आहे. या भरतीत आपणही सहभागी होऊन ...
महाराष्ट्र शासनाने सुमारे बारा हजार पाचशे एवढे जम्बो पोलीस भरती करण्याचे जाहीर केले आहे. या भरतीत आपणही सहभागी होऊन बेरोजगारीवर मात करता येईल. या आशेने झपाटलेले तरुण, तरुणी दिवस - रात्र पालांदूरच्या क्रीडांगणावर शारीरिक, बौद्धिक चाचणी करीत आहेत. गत वर्षभरापासून पोलीस विभागाच्या सौजन्याने पोलीस स्टेशनच्या क्रीडांगणाला नवे रूप देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हौसेला सहकार्य करत पोलीस विभागाने त्यांच्या संपूर्ण महत्त्वाकांक्षेला पाठिंबा दर्शवला आहे. अख्ख्या भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास सर्वात प्रथम पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोहीम पालांदूर पोलीस स्थानकात आखण्यात आली. यापूर्वीचे ठाणेदार अंबादास सूनगार, दीपक पाटील व आताचे मनोज सिडाम यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना यथार्थ बौद्धिक व शारीरिक सहकार्य केलेले आहे.
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या कल्पनेतून पायलट प्रोजेक्टअंतर्गत जिल्ह्यातील तरुणांना पोलीस भरतीकरिता प्रोत्साहित करण्याचे नियोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने पालांदूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार मनोज सिडाम व त्यांचे सहकारी नावेद पठाण दर शनिवारी शारीरिक व बौद्धिक चाचण्या घेत आहेत. त्यांच्यात असलेल्या उणिवा हटकून ओळखत, त्या कशा दूर करायच्या, याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराला गोबरवाही पोलीस स्थानकाचे ठाणेदार दीपक पाटील यांनी पालांदूरला येत उमेदवारांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी पाटील यांनी गोबरवाही येथून पालांदूर गाठत विद्यार्थ्यांच्या प्रेमाला आपुलकीची साथ दिली.
चौकट /डब्बा
पालांदूर पोलीस स्थानकअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील सुशिक्षित उत्साही पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप नियोजित केले आहे. प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये व पालांदूर पोलीस स्थानकामध्ये स्पर्धा पुस्तकांकरिता छोटेखानी ग्रंथालयाची निर्मिती आयोजिली आहे. होतकरू विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडता कामा नये. अशी थेट व्यवस्था पालांदूर पोलीस स्थानकाचे ठाणेदार मनोज सिडाम यांनी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 'मला पोलीस व्हायचेच आहे', ही मनीषा उरी बाळगून ध्येय गाठायचे ठरविलेल्या विद्यार्थ्यांना पालांदूर पोलीस स्थानकाचे सहकार्य निश्चित केले आहे.