अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:52+5:30
लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अस्मानी संकटाने बळीराजाला चांगलेच पछाडले आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच सोमवारी सकाळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला पिकांवरही संक्रांत आल्याने कीड व रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
भंडारा शहरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास पाऊस बरसला. ढगाळ वातावरणामुळे पारा घसरला असतानाच पावसामुळे अधिकच गारवा निर्माण झाला. बंद झालेल्या शेकोट्या पुन्हा ठिकठिकाणी पेटलेल्या दिसल्या. या अवकाळी पावसाने रबी पिकाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे वैनगंगा नदीच्या तिरावरील गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांनाही फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
लाखनी शहरासह तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस बरसला. पालांदूरात सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. बदलत्या वातावरणामुळे आजारालाही खतपाणी मिळत आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मोहाडी तालुक्यातील लोहारा (जांब), सोरणा परिसरात रिमझिम पाऊस बरसला. नाकाडोंगरी येथे ढगाळ वातावरण असतानाच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
तुमसर येथे शहरासह तालुक्यात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. जवळपास एक तास पर्यंत पाऊस बरसल्याने वातावरणात चांगलाचा गारवा निर्माण झाला. थंडीचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधारा घेत असल्याचे दिसून आले. रबी पिकांचे नुकसान झाले असून पुन्हा पाऊस बरसल्यास हातचे पीक जाणार की काय, अशी शक्यता व चिंताही बळीराजाने व्यक्त केली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. पावसाचा सर्वात जास्त फटका नोकरदार व विद्यार्थ्यांना बसला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
वारंवार पावसाने शेतकरी धास्तावला
जिल्ह्यात गत दिवाळीपासून वारंवार अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे होत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेला धान ओला होवून अंकूर फुटले होते. शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसाचा फटका रबी पिकांना बसत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार कोसळणाºया अवकाळी पावसाची धास्ती जिल्ह्यातील शेतकºयांनी घेतली असून प्रशासन मात्र नुकसानभरपाईसाठी पुढाकार घेत नाही.