कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2016 12:29 AM2016-06-25T00:29:19+5:302016-06-25T00:29:19+5:30

यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही.

Prefer short duration rice varieties | कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या

कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या

Next

पावसाची प्रतीक्षा : शामकुंवर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
साकोली : यावर्षी २० जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही कुठ पडतो तर कुठ पडत नाही. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथे १ ते १५ जुनपर्यंत सरासरी पाऊस ३२ मिमी असतो पंरतु यावर्षी १ ते १५ जून २०१६ या काळात फक्त ३.४ मिमी पाऊस पडला. हा पाऊस कोरडवाहू क्षेत्रात धान पेरणीसाठी समाधान कारक नाही. त्यामुळे कमी कालावधीच्या धान वाणांना प्राधान्य द्या, असे आवाहन भात पैदासकार डॉ.बी.जी शामकुंवर यांनी केले आहे.
१६ ते ३० जूनपर्यंत सरासरी पाऊस १६०.३९ मिमी पडतो, परंतु यावर्षी १६ ते २३ जूनपर्यंत फक्त १७ मिमी पाऊस बरसला आहे. २२ ते ३० जून २०१६पर्यंत १४४.७९ मिमी पाऊस अपेक्षित आहे. ओलिताची सोय (बोअरवेल, विहीर) असलेल्या शेतकऱ्यांनी धान बियाणे पेरणी केली असून काही ठिकाणी सुरु आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय नाही त्यांनी अजूनपर्यंत पेरणी केली नसून पावसाची वाट बघत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी २२ ते २५ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडल्यास पेरणी करावी. यामध्ये कमी कालावधीच्या लवकर निघणाऱ्या ११५-१२० दिवसाच्या धान वाणांना प्राधान्य द्यावा. कृपया मध्यम कालावधी जसे १३०-१३५ दिवस व उशिरा कालावधी १३६-१४५ दिवसाच्या धान वाणाची पेरणी सुरु करु नये. ११५ ते १२० दिवस कालावधीचे धान वाण २२ ते २५ जूनपर्यंत पेरणी केल्यास व या काळात चांगला पाऊस झाला व त्यानंतर रोवणी २० ते २५ दिवसाच्या रोपांची केल्यास हे पिक १३ ते २४ सप्टेंबर दरम्यान फुलोऱ्यात येईल. कुबेरा अवस्था, त्या अगोदर व त्यानंतर १५ दिवस धान पिकाला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. ५ ते १० सेमी पाण्याची पातळी, ते सहजपणे उपलब्ध होण्याची शक्यता असते व हे पीक २४ आॅक्टोबरपर्यंत कापणीसाठी तयार होऊन समाधानकारक उत्पादन मिळते.
ओलीताची सोय नसणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी १२५ ते १४५ दिवसपर्यंत कालावधीच्या धान वाणांची निवड व प्रेरणी करु नये कारण सप्टेंबर नंतर परतीच्या पाउसाला सुरुवात होते. १६ ते ३० सप्टेंबर पर्यंत सरासरी पाऊस ६९.२७ मिमी असतो व त्यानंतर १ ते १५ आॅक्टोंबर पर्यंत २०.८८ मिमी पाऊस पडतो. उशिरा कालावधीचे वाण या कालावधीत फुलोरा अवस्थेत असतात व त्यांना पाण्याचा ताण पडतो. उत्पादनात घट येते.
शेतकरी बांधवांनी जमीन तयार असल्यास रोपवाटिका (पऱ्हेखणी) तयार करुन १ मीटर रुंद, १० सेमी उंच व योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करुन ठेवावे, समजा २ ते ४ दिवसात सतत पाऊस पडल्यास व नंतर उघाड दिल्यास गादीवाफ्यावर बियाणांची पेरणी करणे सोपे जाते. शेतकरी चिखलपऱ्हे टाकतात. त्यामध्ये रोपे उपटतानी त्यांची मुळे तुटतात व रोपांना इजा होते व रोवणी झालेली बरीच रोपे मरतात.
माहितीसाठी कृषी संशोधन केंद्र साकोली किंवा जवळच्या तालुका मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात संपर्कसाधावा असे आवाहन डॉ. बी.जी शामकुंवर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Prefer short duration rice varieties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.