दोन अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या
By admin | Published: May 29, 2016 12:37 AM2016-05-29T00:37:23+5:302016-05-29T00:37:23+5:30
तुमसर तालुक्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने मुदतपूर्व बदल्या केल्याची माहिती आहे.
तुमसर : तुमसर तालुक्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने मुदतपूर्व बदल्या केल्याची माहिती आहे. यात तुमसरचे पोलीस निरीक्षक व दुसरे तुमसर पंचायत समितीचे खंडविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पूर्व विदर्भातील शेवटच्या टोकावर तुमसर तालुका आहे. राज्य शासन नियमाप्रमाणे दरवर्षी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करते. उन्हाळ्यात बहुधा सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. तुमसर येथील पोलीस निरीक्षक किशोर गवई यांचे स्थानांतरण अमरावती (ग्रामीण) येथे झाल्याची माहिती आहे. त्यांचा तुमसरात केवळ २ वर्षे ३ महिन्यांचा कार्यकाळ झाला होता. एक कर्तव्यदक्ष तथा त्यांच्या कार्यकाळात शांतता, सुव्यवस्था व असामाजिक तत्वांच्या लोकांच्या त्यांनी मुसक्या आवळून दरारा निर्माण केला होता. तत्पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी बुरडे यांचे केवळ सहा महिन्यातच स्थानांतरण झाले होते.
राज्यातील ७० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली असून दि. ३० मे रोजी मॅटचा निकाल लागणार आहे. तुमसरचे खंडविकास अधिकारी केशव गड्डापोड यांचेही स्थानांतरण झाल्याचे समजते. त्यांना शुक्रवारी कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी रिलीव्ह केल्याची माहिती आहे. तुमसरात गड्डापोड केवळ एकच वर्षे राहिले हे विशेष.
मी वैद्यकीय रजा घेतली होती. मी पुण्याला प्रशिक्षणाला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला आज रिलीव्ह केले असे त्यांनी लोकमतला सांगितले. पं.स. पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर लावलेले आरोपात तथ्य नाही. नियमानुसार मी सर्व माहिती सदस्यांना देत होतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली. (तालुका प्रतिनिधी)