स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खिशात
By admin | Published: April 18, 2015 12:20 AM2015-04-18T00:20:36+5:302015-04-18T00:20:36+5:30
आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे.
प्ले-स्टोअरवर तब्बल २५० अॅप्स : मोबाईलची दुनिया; पुस्तके घेण्यापेक्षा नव्या अॅप्सवर अभ्यास करण्याकडे कल
भंडारा : आजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी संपूर्ण तयारी अॅप्सच्या माध्यमातून करून घेत आहे. गूगल प्ले स्टोअरवर स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे तसेच परीक्षांची माहिती देणारे तब्बल २५० हून अधिक अॅप्स मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत.
नोकरी हा प्रत्येक तरुण-तरुणीसाठी कळीचा प्रश्न बनला आहे. खूप शिकूनही नोकरी मिळेलच, याचा नेम नाही. त्यामुळे अनेक जण बारावीनंतरच सरळ एमपीएससी, युपीएससी, बँकिंग आणि इतरही स्पर्धा परीक्षांचा आव्हानात्मक मार्ग स्वीकारुन स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन करणाऱ्या सर्वोत्तम परीक्षा केंद्रात शिकवणी लावण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी विविध विषयांची पुस्तके खरेदी करीत आहे. ही सर्व आॅफलाईन धडपड सुरू असताना आॅनलाईन जगात वावरणारी युवा पिढी त्यापासून नामानिराळी राहिली तर नवलच.
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना इंटरनेटची गरज महत्त्वाची झाली आहे. कुठलिही नवी माहिती मिळविण्याचा तो महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी संगणकावर नेटचा वापर केला जात असे. मागील दोन वर्षात स्मार्टफोनने इंटरनेट प्रत्येकाच्या खिशात आले आहे. त्यातच गूगल प्ले स्टोअरने स्पर्धा परीक्षांची माहिती असणारी, तयारी करून घेणारी, ज्ञानात भर घालणारी २५० अॅप्स आहे. या माध्यमातून तरुणांनाही एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, बँकिंगची माहिती मिळत असल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे. (नगर प्रतिनिधी)
परीक्षांची माहिती देणारे अॅप्स
प्ले स्टोअरवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे दोन शब्द टाकताच अॅप्सचा खजिना समोर येतो. परीक्षांची तयारी करताना सर्वप्रथम कुठली परीक्षा या काही दिवसात आहे हे जाणून घेण्यावर युवकांचा भर असतो. आधी ही माहिती स्पर्धा परीक्षा साहित्याची विक्री करीत असलेल्या दुकानांमध्ये, वृत्तपत्रे व काही संकेतस्थळावरून मिळत होती. आता ती माहिती देणारी एमपीएससी अलर्ट, नौकारी अलर्ट, सरकारी नोकरी अशी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. ती मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यास आगामी परीक्षांसंदर्भात सविस्तर माहिती मिळत असते. त्यामुळे अशा अॅप्सला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सर्वाधिक पसंती देत आहेत.
बँक परीक्षांची पुरेपूर तयारी
आयबीपीएसद्वारे राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा एकत्र घेणे सुरू झाले आहे. त्यामुळे एकगठ्ठा बँकेच्या जागा निघत असतात. तसेच बँकेची नोकरी सुखाची, असा समज युवावर्गात असल्यामुळे बँकांच्या परीक्षा देण्यावर सर्वाधिक भर असतो. त्यामुळे गूगल प्ले स्टोअरवर बँकर अड्डा, आयबीपीएस एक्झाम, बँक एक्झाम प्रॅक्टिस अशी अनेक अॅप्स उपलब्ध असून ती परीक्षार्थीसाठी फायद्याची ठरत आहेत.
मुलाखतीची तयारी
नोकरी मिळण्याची सर्वात शेवटची पायरी म्हणजे मुलाखत. यासाठी स्पर्धकाने स्वत: खूप सजग असणे आवश्यक असते. यासाठी भरपूर वाचन गरजेचे असते. असे असले तरी मुलाखतीची तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी मुलाखतीची माहिती देणारे बहुसंख्य अॅप्स फायदेशीर ठरत आहेत.
आॅनलाईन परीक्षा
प्ले-टोअरवर प्रश्नपत्रिका सोडविण्याची सोय असलेली टेस्ट सिरिज स्वरूपातील अॅप्स उपलब्ध आहेत. त्याठिकाणी त्वरित बरोबर उत्तरे मिळण्यासोबत प्रश्नोत्तरे संग्रही ठेवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.