जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:18+5:302021-08-20T04:41:18+5:30
पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसला. शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. मध्यंतरी तुरळक पाऊस कोसळला. परंतु ...
पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसला. शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. मध्यंतरी तुरळक पाऊस कोसळला. परंतु हा पाऊस रोवणीयोग्य नव्हता. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा उपलब्ध करीत रोवणी केली. मात्र पावसाचा पत्ता नव्हता. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. अशातच मंगळवार सायंकाळपासून पावसाचे आगमन झाले. बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी ३ नंतर काळ्याकुट्ट आभाळासह पाऊस बरसायला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी असून १ जून ते १९ ऑगस्टपर्यंत ८९१.९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. या कालावधीत ७२८.६ मिमी म्हणजे सरासरीच्या ८२ टक्के पाऊस कोसळला आहे. गत २४ तासांत २५.३ मिमी पावसाची नोंद झाली असून यात भंडारा तालुक्यात २८.४ मिमी, मोहाडी १८.७ मिमी, तुमसर १८ मिमी, पवनी १२.६ मिमी, साकोली ६० मिमी, लाखांदूर १ मिमी आणि लाखनी तालुक्यात ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नदी-नाले खळखळून वाहायला लागले असून प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
बाॅक्स
गोसे प्रकल्पाचे २३ दरवाजे उघडले
पवनी : गत दोन दिवसांपासून गोसे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सायंकाळी या प्रकल्पात २४३.६५० मीटर पाणीपातळी नोंदविण्यात आली. संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी या प्रकल्पाचे २३ वक्र दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यातून २५४९.४६५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीपात्रात पाणीपातळीत वाढ झाली असून नदीतिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.