अध्यक्षानेच केली लाखोंची अफरातफर
By admin | Published: November 29, 2015 01:35 AM2015-11-29T01:35:22+5:302015-11-29T01:35:22+5:30
तालुक्यातील पुयार येथील सेवा सहकारी संस्थेचे सचिव आणि संचालक मंडळाची दिशाभूल करीत संस्थेच्या अध्यक्षानेच वसुली अंतर्गत लक्षावधी रकमेची अफरातफर केली.
प्रकरण पुयार संस्थेचे : अफरातफर रकमेपैकी नऊ लाख संस्थेला केले जमा
लाखांदूर : तालुक्यातील पुयार येथील सेवा सहकारी संस्थेचे सचिव आणि संचालक मंडळाची दिशाभूल करीत संस्थेच्या अध्यक्षानेच वसुली अंतर्गत लक्षावधी रकमेची अफरातफर केली. त्यानंतर संचालक मंडळाला पुरावे आढळून येताच हे बिंग बाहेर उघडकीस येऊ नये यासाठी संस्था अध्यक्षांनीच संस्थेकडे ९ लाख रूपयांची रक्कम जमा केली.
मागील काही वर्षात संबंधित संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांनी संगनमताने १२ लाख रूपयाची अफरातफर केल्याचा आरोप संस्था संचालकांनी केला होता. याप्रकरणी संबंधित संचालकांनी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार करून चौकशी करुन दोषीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या मागणीनुसार जिल्हा उपनिबंधकानी चौकशीचे आदेश दिले.
या चौकशी सदर संस्थेत १२ लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संस्था अध्यक्ष मुनेश्वर कापगते यांनी अपरातफर रकमेपैकी फेरवसुलीअंतर्गत सबळ पुरावे संस्थेकडे मिळताच १६ आॅक्टोबर रोजी २ लाख रुपये, २७ आॅक्टोबर रोजी ३ लाख आणि १० नोव्हेंबर रोजी ४ लाख असे एकूण ९ लाख रूपये संस्थेकडे जमा केले. ही रक्कम फेरवसुलीत दाखविण्यात आली.
सदर फेरवसूली रकमेचा भरणा लाखांदूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत पावती क्रमांक ६६३७०९, ६६३७३९ व ६६३७८७ नुसार जमा करण्यात आले आहे. मात्र या संस्थेअंतर्गत नेमकी किती लाख रुपयांची अफतफर झाली, हे सांगणे अधिकाऱ्यांनी टाळले. असे असले तरी अफरातफरीच्या रकमेपैकी आणखी फेरवसूलीची रक्कम शिल्लक असल्याचे सांगितल्याने संस्थेतील आणखी घबाड उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या संस्थेअंतर्गत वसुली पावतीवरील संस्था अध्यक्षांला सह्या तसेच अपरातफर रकमेपैकी फेरवसूली रकमेच्या भरल्या पावतीवरील सह्या या संस्था अध्यक्षांच्याच असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी संस्था अध्यक्ष जबाबदार असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (तालुका प्रतिनिधी)