कारवाईच्या धास्तीने दुचाकीवरील ‘प्रेस’ काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:16 PM2017-11-29T22:16:21+5:302017-11-29T22:17:14+5:30
जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे यांच्या दुचाकीवर मागील अनेक वर्षांपासून 'एक्स-प्रेस' असे नंबर प्लेटवर लिहिलेले होते.
प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे यांच्या दुचाकीवर मागील अनेक वर्षांपासून 'एक्स-प्रेस' असे नंबर प्लेटवर लिहिलेले होते. कर्मचारी असतानाही पत्रकारितेचा आव आणत असल्याचे वृत्त २२ नोव्हेंबरला ‘लोकमत’ने सचित्र प्रकाशित केले. यामुळे कारवाईच्या धास्तीने पडारे यांनी त्यांच्या दुचाकीवरील ‘प्रेस’ काढले आहे.
सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोट येथे असलेले प्रशिक्षणाला पाठ दाखविल्याचा ठपका जिल्हा परिषद प्रशासनाने ठेवला असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या अन्य बाबींबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. राजन पडारे हे नोकरीवर रूजू होण्यापुर्वी एका प्रादेशिक वर्तमानपत्रात ग्रामीण वार्ताहर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या दुचाकीवर पूर्वी ‘प्रेस’ लिहिले होते. मात्र आरोग्य विभागात रूजू झाल्यानंतर त्यांनी ‘प्रेस’ शब्द न काढता नवीन शक्कल लढवून ‘एक्स प्रेस’ नमूद केले होते.
या माध्यमातून त्यांनी कर्मचारी असतानाही पत्रकारितेचा आव आणल्याचे यावरून दिसून येत होते. ‘लोकमत’ने याबाबत २२ नोव्हेंबरला वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे कारवाईच्या धास्तीने पडारे यांनी त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३६ टी ७७२३ वर असलेले ‘एक्स प्रेस’ आता काढून टाकले आहे.
त्यामुळे पडारे यांनी ‘प्रेस’ शब्दाच्या नावावर बनवाबनवीचे प्रकार केले नसावे, याबाबत शंका उपस्थित होत आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणाला जाण्यासाठी त्यांना आरोग्य विभागाने रिलिव्ह केल्यानंतरही ते न जाता कार्यालयात उपस्थित होते. याप्रकरणात त्यांना वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी निलंबित केले.
मात्र सुमारे आठवडा होत असतानाही ते निलंबनानंतर पंचायत समिती लाखांदूर येथे रूजू झाले नाही. त्यामुळे त्यांना वरिष्ठांचा अभय तर नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान पडारे रजेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
निलंबनानंतर पडारे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश बजावले. काही कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता त्यांच्या अनेक किस्स्यांची माहिती मिळाली. ‘लोकमत’मुळे त्याची माहिती होऊ शकली. नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल.
-डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.