गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीस प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:48+5:302021-09-10T04:42:48+5:30
भंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घेत जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणूक काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये प्रतिबंध घातला आहे. ...
भंडारा : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घेत जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणूक काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये प्रतिबंध घातला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात १० ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रेक द चेेन अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती असल्याने गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि कोरोना नियमांचे पालन करून करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान मिरवणूक काढल्यास गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्दीचे स्वरूप पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना मात्र संपलेला नाही. गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाकारण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गणेशोत्सवादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात विसर्जन मिरवणूक काढण्यावर एका आदेशान्वये प्रतिबंध लावला आहे.