ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी थांबता थांबेना, प्रवाशांची लूट, सुविधाही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 04:05 PM2021-11-03T16:05:13+5:302021-11-03T16:10:01+5:30
दिवाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत.
भंडारा : वाळीपूर्वी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे डिझेल वाढल्याने तिकीट वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्स व्यावसायिक सांगताहेत.
कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात सापडला आहे. आता कुठे हळूहळू ट्रॅव्हल्सची चाके पूर्वपदावर येत आहेत. त्यातच डिझेल दरवाढीचा फटका बसत असून, वाढत्या महागाईनुसार ट्रॅव्हल्स चालकांनी तिकिटाचे दर वाढविले आहेत.
दिवाळी सणानिमित्ताने शासकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच अन्य कामानिमित्ताने बाहेरगावी असलेले नागरिक आपल्या मूळगावी परततात. दिवाळीनिमित्त सर्वाधिक पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याचाच फायदा घेत ट्रॅवल्स चालकांनी तिकिटांचा मनमानी दर वाढवला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात आहे, तर दुसरीकडे दिवसेंदिवस डिझेलची दरवाढ होत असल्याने ट्रॅव्हल्स चालकांना तिकिटाची दरवाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असे चालक सांगत आहेत. चालकांचा, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चामुळे तिकिटाचे दर वाढले आहेत. प्रवाशांच्या खिशाला मात्र यामुळे कात्री लागत आहे. या काळात खासगी वाहनांची चलती असून प्रवासी ऑनलाइन ट्रॅव्हल्स बुकिंग करीत आहेत. यात विम्याच्या नावाने आणखी भर पडली आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी ग्राहकांची लूट थांबविली पाहिजे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. ट्रॅव्हल्सच्या तिकिटांच्या दरावर आरटीओ ऑफिसने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.