साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:38+5:302021-06-25T04:25:38+5:30
भंडारा : ऊस गोड वाटला तर मुळासकट खाऊ नये, अशी म्हण आहे. परंतु गूळ हा उसापासून तयार केला जातो. ...
भंडारा : ऊस गोड वाटला तर मुळासकट खाऊ नये, अशी म्हण आहे. परंतु गूळ हा उसापासून तयार केला जातो. दरम्यान, साखरेपेक्षा गुळालाच भाव अधिक, असे दिसून येत आहे. गत दोन दशकांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास साखरेपेक्षा गुळाचे भाव जास्त आहेत.
आधीच्या काळी घराघरात गुळाला अनन्यसाधारण मागणी होती. काळानुरूप बदल होत गेल्याने गुळाचा वापर कमी झाला. साखर कमी किमतीत मिळत असल्याने तिचा वापर वाढला तर गुळाचा खप कमी झाला. मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या व आजीबाईच्या बटव्यातून साकारलेल्या विविध कल्पकतेतून गुळाला वाव मिळत गेला. गूळ हा गुणधर्माने गरम समजला जातो. त्याचा आजही अनेक पदार्थांत वापर केला जातो. विशेषत: लाडूमध्ये याचा वापर होत असतो. मात्र, चहा व अन्य भाज्यांमध्येही गुळाचा वापर होतो. परिणामी साखर आणि गुळाला समतुल्य मागणी असल्याचे दिसून येते. गत २० वर्षांपासून गूळ आणि साखर यांच्या दरावर नजर घातल्यास त्यात दुपटीने वाढ झाल्याचे समजते. सद्यस्थितीला गुळाचे भाव साखरेपेक्षा २० ते २५ रुपये प्रतिकिलो जास्त आहे. मात्र, गुळाची मागणी कमी झालेली नाही. अपेक्षेनुरूप गुळाच्या बनविण्याच्या पद्धतीत फारसा बदल झाला नसला तरी शुद्ध रूपात मिळणाऱ्या गुळाला अधिक मागणी आहे. त्यात ५ ते १० रुपये किंमतही अधिक आहे. सध्यातरी साखरेपेक्षा गुळाचे भाव अधिकच असल्याचे दिसून येते.
पूर्वीच्या काळी गुळाचा चहा जास्त आणि साखरेचा वापर कमी होत होता. कालांतराने यात बदल होत गेला. आधुनिकीकरणात साखरेचे प्रमाण वाढले. परिणामी शरीरातही साखर वाढत गेली. त्यामुळेच आजारालाही बळ मिळाले. शरीरात साखरेचे प्रमाण योग्य असावे.
-डाॅ. नरेंद्र कुंभरे, भंडारा.
गावात मात्र साखरच
पूर्वी गावात गुळाचा अधिक वापर व्हायचा. सकाळ झाली की दुकानात गूळ आणि चहापत्तीच विकायची. मात्र, आता चहापत्ती आणि साखरची मागणी केली जाते. गावात आता साखरच हवी आहे. गुळाचा वापर कमी झाल्याचे दिसून येत आहे. जुनी मंडळी मात्र गुळाचा वापर करतात.
-अनुप लांजेवार, दुकानदार
शहरात साखर आणि गुळालाही सारखीच मागणी
शहरातील बाजारपेठेत साखर व गुळाला समतुल्य मागणी आहे काय? असे कधी कधी वाटते. सीझनमध्ये गुळाला अधिक मागणी असते. मात्र, त्या तुलनेने साखरेचाही खप अधिक आहे. आता काळानुरूप बदल होत असला तरी अनेक जण गुळाचा चहा प्यायला लागल्याचेही सांगतात. दरम्यान, शहरातील बाजारपेठेत गुळाचे भाव वधारले आहेत.
-भास्कर कुंभारे, व्यापारी
भंडारा शहराची लोकसंख्या वाढत असून, किराणा साहित्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. शहरात साखर आणि गुळाला सारखीच मागणी असल्याचे जाणवते. साखर ३८ ते ४० रुपये या दराने विकली जाते, तर गूळ ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. संक्रांतीच्या काळात गुळाला जास्त मागणी असते. मात्र, त्यानंतर थोडीफार मागणी कमी होते.
-राजेंद्र खेडीकर, व्यापारी