तुरीला १० हजारांचा भाव; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 05:06 PM2024-07-17T17:06:10+5:302024-07-17T17:16:34+5:30

शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही: नवीन तुरीसाठी सहा महिने प्रतीक्षा

Price of Tur dal 10 thousand; What about farmers? | तुरीला १० हजारांचा भाव; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

Price of Tur dal 10 thousand; What about farmers?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
महिन्याभरापूर्वी खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तुरीची लागवड होऊन पीक फुटव्यांवर आहे. नवीन तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येण्यास सहा महिन्यांचा कालावधी आहे. अशातच जुलै महिन्यात भंडारा व तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीचे दर १० हजार ४०० रुपयांवर गेले आहेत; परंतु सध्या शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही. त्यामुळे दर वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


गतवर्षी जिल्ह्यात ९ हजार ४४५ हेक्टरवर सलग तसेच धुऱ्यांवर तूरपिकाची लागवड झाली होती. सुमारे ४०.८१ मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले. यंदा ११ हजार ४०० हेक्टरवर तूर लागवडीचे नियोजन असून ६८.४० मेट्रिक टन उत्पादनाचा लक्ष्यांक कृषी विभागाचा आहे. जून महिन्यात लागवड झालेली तूर दुसऱ्या वर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती येते. हलक्या प्रतीची म्हणजेच अल्पमुदतीची तूर असल्यास डिसेंबर महिन्यातच शेतकऱ्यांच्या पदरी पडते. सध्या शेतकऱ्यांकडे जुनी तूर शिल्लक नाही. त्यामुळे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या उपयोगी न ठरता व्यापाऱ्यांच्या पदरी पडणारे आहे.


तुरीला आधारभूत किमत किती?
• आधारभूत किमत योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने २०२३-२४ या वर्षात तुरीला ७ हजार रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. परंतु, खुल्या बाजारात तुरीला यापेक्षा अधिक भाव दिला जातो.

नवीन तुरीला दर मिळणार काय?
• नवीन तुरीचे उत्पादन सहा महिन्यांनंतर शेतकऱ्यांच्या हाती येईल. तेव्हा नवीन तुरीला बाजारात चांगला दर मिळणार काय, असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. सध्या तुरडाळीला १८० ते २०० रुपयांचा भाव मिळतो आहे.

बाजार समितीत आवक नाही
• सध्या तुमसर व भंडारा बाजार समितीत तुरीची आवक नाही. शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक नाही. आवक मंदावली असताना दर १० हजारावर गेले आहेत. तूरडाळीचे भावही कडाडले आहे.


शेतकरी काय म्हणतात...
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक नसल्याने तुरीचे भाव वाढले आहेत. परंतु, दर वाढून उपयोग काय? सध्या शेतकऱ्यांकडे सध्या तूर शिल्लक नाही. यामुळे शेतकयांच्या पदरी काहीही पडणार नाही. उलट व्यापारी मालामाल होण्याची शक्यता आहे.
- श्रीकांत डोरले, शेतकरी, करडी.

Web Title: Price of Tur dal 10 thousand; What about farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.