रासायनिक खताच्या किमती कंपन्यानी परस्पर वाढविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:19+5:302021-07-04T04:24:19+5:30
दिघोरी (माेठी) : कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खतांच्या कमी झालेल्या नवीन दरांची अंमलबजावणी करण्याचे जाहिर केले ...
दिघोरी (माेठी) : कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खतांच्या कमी झालेल्या नवीन दरांची अंमलबजावणी करण्याचे जाहिर केले हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला हाेता. मात्र आता महिना उलटत नाही ताेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या खताच्या कमाल किंमतीमध्ये ७५ रुपयांची दरवाढ जाहीर केली. शासनाच्या आदेशाला बगल देण्यात येत असून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.
गत मे महिन्यात कच्चा मालाच्या किंमती वाढल्याचे कारण पुढे करीत रासायनिक खते इतर कंपन्यांनी खताची दरवाढ केली हाेती. त्यामुळे एका खताच्या गाेणीमागे पाचशे ते सातशे रुपये अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत हाेता. मात्र शासनाने वेळीच दखल घेत खत उत्पादक आणि वितरक कंपन्यांना खतावरील अनुदान वाढवून दिले त्यामुळे खत दरवाढीचा तिढा सुटला. त्याअनुषंगाने २० मे पासून कृषी विभाग आणि खत कंपन्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून खताच्या कमी झालेल्या दराची अंमलबजावणी हाेत असल्याचे सांगितले. कपंनीनिहाय आणि ग्रेड निहाय रासायनिक खतांचे दर जाहीर करण्यात आले. मात्र महिना उलटत नाही ताेच एका इंटरनॅशनल कंपनीने आपल्या कमाल विक्री किमंतीमध्ये ७५ रुपयांची दरवाढ केली आहे. यापूर्वी या कंपनीच्या २०:२०:००:१३ या ग्रेडची कमाल विक्री किंमत १०५० जाहीर केली हाेती. परंतु आता या खताची किंमत ११२५ रुपये जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माेठा भुर्दंड बसणार आहे. एकीकडे शासनाने सर्व कंपन्यांना रासायनिक खताचे दर ठरवून दिले आहे. तरीही काही कंपन्या खताच्या किंमती वाढवित आहे. याचा शेतकऱ्यांना माेठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शासनाने यावर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
काेट
कंपन्यांनी खताची केलेली दरवाढ अत्यंत निंदनीय आहे. अधिकचा नफा कमविण्याच्या हा प्रकार आहे. खताची दरवाढ मागे न घेतल्यास जिल्हा ॲग्राे डिलर असाेशिएशनच्या वतीने दरवाढ करणाऱ्या कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- माेरेश्वर बाेरकर, अध्यक्ष, जिल्हा ॲग्राेडिलर असाेशिएशन
काेट
आंतरंराष्ट्रीय बाजारपेठेत रासायनिक खत तयार करण्याच्या कच्च्या मालात वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ करावी लागते. वाढीव दर १ जुलैपासून लागू झाले आहेत. कच्चा मालाच्या दरात घसरण झाली की खताचे दरही कमी हाेतील. काेणतीही कंपनी घाट्याच्या व्यवसाय करु शकत नाही.
- भुपेंद्र सिंग, प्रादेशिक व्यवस्थापक काेराेमंडल इंटरनॅशनल