तूर डाळीचे भाव कोसळले
By Admin | Published: January 2, 2017 01:24 AM2017-01-02T01:24:41+5:302017-01-02T01:24:41+5:30
शिर्षक आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. नोटाबंदीचा फटका आणि मागणी कमी व पुरवठा जास्त यामुळे तुरडाळीचे भाव कोसळले आहे.
मागणी कमी, पुरवठा जास्त : ९०-९५ रुपये प्रति किलो, नोटाबंदीचाही फटका
भंडारा : शिर्षक आश्चर्य वाटेल परंतु हे सत्य आहे. नोटाबंदीचा फटका आणि मागणी कमी व पुरवठा जास्त यामुळे तुरडाळीचे भाव कोसळले आहे. १२० ते १३० या प्रति किलो दरात उपलब्ध होणारी उच्चप्रतीची तुरडाळ सध्या स्थितीत बाजार पेठेत ९० ते ९५ रुपयापर्यंत विकली जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भात बहुतांश जणांना माहिती नसल्याने आर्थिक लुबाडणूकही होत असल्याचेही दिसून येत आहे.
सर्व सामान्य लोकांसह सर्वांच्याच ताटातील विशेष व आवश्यक पदार्थ म्हणून गणल्या जाणा-या तुर डाळीचे भाव मागील दोन वर्षांपासून गगणाला भिडले आहे. १८० ते २०० रुपये प्रति किलो पर्यंत मजल मारलेल्या तुरडाळीच्या भावाने जनसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. ८ नोव्हेंबरनंतर नोटाबंदीच्या फटक्यानंतर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल कमी झाली. स्टॉक झालेले धान्य विक्रीला ज्याप्रमाणात विकले पाहिजे होते, तेवढ्या प्रमाणात त्या धान्याला मागणी नव्हती. असेच हाल डाळीच्या बाबतीतही झाली. उल्लेखनिय म्हणजे भंडारा शहरात तुर डाळीचे स्टॉकीस्ट नाहीत. परिणामी खुल्या बाजारातून अथवा मिलमधून तुरडाळीची खरेदी करुन जनसामान्यांसाठी उपलब्ध होत होती. नोटाबंदीचा फटका व मागणी कमी व पुरवठा जास्त झाल्याने मागील आठ ते दहा दिवसात तूरडाळीचे भाव प्रति किलो मागे ३० - ४० रुपये पर्यंत घसरले आहेत.
कमी दर्जाची डाळ ६० ते ७० रुपये प्रति किलो तर उच्च प्रतिची डाळ ९० ते ९५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. याची माहिती
सर्वांना नसल्याने ते जुन्या किंमतीतच डाळीची खरिदी करीत आहेत. तुर डाळीचे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ताटातून वरण दिसेनासे झाले होते. दर कमी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. (प्रतिनिधी)
गल्लोगल्ली विक्री
विशेषत: ग्रामीण भागात असलेल्या मिलमधून तूरडाळीची उचल करुन तालुका मुख्यालयासह भंडारा शहरातही गल्लोगल्ली तुरडाळ विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. थेट मिलमधून डाळ विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने नागरिकांचीही चंगळ झाली आहे. ७० तर कधी ९० रुपये या दराने ही डाळ उपलब्ध होत आहे. याचा फटका मात्र व्यापा-यांवर दिसून येत आहे. बोलून दाखवित नसले तरी ज्या व्यवसायात गुंतलेल्यांना लाखोंचा फटका बसला आहे.