कवडसी ग्रामपंचायतचा देशपातळीवर गौरव
By Admin | Published: May 15, 2017 12:38 AM2017-05-15T00:38:04+5:302017-05-15T00:38:04+5:30
भंडारा तालुक्यातील कवडसी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा व शासकीय योजनांचा ग्रामस्थांना दिलेल्या लाभाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान : भंडारा पंचायत समितीच्या सन्मानात मानाचा तुरा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्यातील कवडसी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा व शासकीय योजनांचा ग्रामस्थांना दिलेल्या लाभाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. कवडसी ग्रामपंचायतीला २०१५-१६ च्या दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्मृतीचिन्ह व आठ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. लखनौ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय मंत्री (पंचायत राज) नरेंद्रसिंह तोमर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच रंजना बाभरे, सचिव कांचन कुंभारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या ग्रामपंचायतने तत्कालीन सरपंच व विद्यमान जि. प. सदस्य प्रेम वनवे यांच्या कार्यकाळात शासकीय योजनांची अंमलबजावणी करून गाव विकास साधला. यासोबतच गावाला हागणदारीमुक्त गाव, ग्रामस्वच्छता अभियान, दलितवस्ती पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान केले आहे.
या पुरस्कारासाठी कवडसीचे कार्य उल्लेखनीय आहे. या पुरस्काराकरिता उपसरपंच शामराव राऊत, सदस्य प्रकाश घोल्लर, सदस्य रामसागर शामकुवर, अर्जना घोल्लर, अनुराधा घोल्लर, रोशनी कारेमोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह मुख्याध्यापक दिलीप कुकडे, रविंद्र फंदे, अंताराम खराबे, शा.व्यं.स. अध्यक्ष, लिल्हारे, बानाईत, ग्रा.पं. चे संजय बाभरे व देवानंद बांगर, विष्णू शामकुवर, कर्मचारी यांच्यासह कवडसी येथील सर्व ग्रामस्थांचे योगदान लाभले. कवडसीला मिळालेल्या पुरस्काराने भंडारा पंचायत समितीचा सन्मान वाढला आहे.
या पुरस्कारामुळे कवडसी गावाचे नाव देशपातळीवर गौरविण्यात आले, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. तसेच एकोप्याने शासकीय योजनांची अंमलबजावणी करून ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ दिला. यामुळे नागरिकांचे जिवनमान उंचावण्यास मदत होईल.
- प्रेम वनवे, जि.प. सदस्य, भंडारा.
या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे.
- रंजना बाभरे, सरपंच