सात जणांचे प्राण वाचविणारा अभिमान प्रशासनाकडून बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:15 PM2019-06-28T22:15:43+5:302019-06-28T22:18:12+5:30
भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता.
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : भरधाव काळी-पिवळी जीप ४० फुट उंच पुलावरून चुलबंद नदीत कोसळली. एकच हल्लकल्लोळ झाला. वाचवा वाचवा असे जीवाच्या आकांताने ओरडने सुरू झाले. त्याच जीपमध्ये अभिमान सतीमेश्रामही प्रवास करीत होता. स्वत:चे मरण डोळ्याने बघणाऱ्या अभिमानने एवढ्या भीषण अपघातातही धीर न सोडता जखमी होवूनही अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या या प्रयत्नामुळे सात जणांचे प्राण वाचले. प्रसंगावधान राखून मरणाच्या दारेतून सुटका करणारा अभिमानचा मात्र कोणी गौरव केला नाही. प्रशासनानेही त्याच्या या शौर्याची दखल घेतली नाही. कुणी दखल घेतली नसली तरी सात जणांचे प्राण वाचविण्याचे समाधान आजही अभिमानच्या चेहºयावर दिसते.
साकोली तालुक्यातील कुंभली येथे १८ जून रोजी पुलावरून काळी-पिवळी जीप कोसळून सहा जणांचे बळी गेले तर सात जण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. याच अपघातग्रस्त जीपमधून सासरा येथील अभिमान सतीमेश्राम आपल्या पत्नीसह प्रवास करीत होता. सासºयाची तेरवी आटोपून सेंदुरवाफा येथे येथून पत्नी वंदनासोबत परतीच्या प्रवासाला होता. साकोली येथून काळी-पिवळी जीपमध्ये तो पत्नीसह बसला होता. चुलबंद नदीवर चालकाचे नियंत्रण गेले आणि जीप ४० फुट खोल नदीत कोसळली. अभिमानही या जीपसोबत खाली कोसळला. चालकाच्या बाजूला बसून असल्याने त्याला कमी प्रमाणात मार लागला. चालक तर पळून गेला होता. मात्र अभिमानने प्रसंगावधान राखून त्याच क्षणी जीपमध्ये अडकलेल्या एक एक प्रवाशाला बाहेर काढणे सुरू केले. अर्ध्या तासानंतर मदत पोहचली. मात्र अभिमानने समयसुचकता दाखविल्याने सात जणांचे प्राण वाचले.
प्रस्तुत प्रतिनिधीने त्याची भेट घेतली असता अभिमान म्हणाला, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांचे प्राण वाचविता आले असते तर सार्थक झाले असते. परुं नियतीपुढे कुणाचेही काही चालत नाही, असे तो म्हणाला.
सहा जणांचे प्राण वाचविल्यानंतरही अभिमानची कुणी दखल घेतली नाही. प्रशासनानेही त्याचा कुठे गौरव केला नाही. यावर अशिक्षित असलेला अभिमान म्हणाला, मी कोणत्याही पुरस्काराची आशा केली नाही. ज्या सात जणांचे प्राण वाचविले तोच माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे. साकोली तालुक्यासाठी अभिमान असलेल्या अभिमान सतीमेश्रामचा प्रशासनाने योग्य गौरव करावा, अशी मागणी होत आहे.
पुरस्काराची आशा नाही
साकोली तालुक्यासाठी अभिमान ठरलेला अभिमान सतीमेश्रामला कोणत्याही पुरस्काराची आशा नाही. आपण आपले कर्तव्य पार पाडले. पुरस्कार किंवा बक्षीस मिळून काय होणार. त्या सहा जणांचे प्राण वाचले असते तर तोच खरा माझ्यासाठी पुरस्कार होता, असे तो सांगतो. मात्र प्रशासनाने शौर्याची दखल घेत पुरस्कृत करावे, अशी अपेक्षा आहे.
असा झाला अपघात
साकोलीवरून प्रवासी घेऊन काळी-पिवळी जीप लाखांदूरकडे निघाली. कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलाजवळ चालक अचानक घाबरला. जीपचे स्पेरिंग इकडे तिकडे फिरू लागला. काही तरी अचानक बिघाड झाला असावा. जीपचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच गेला. पाहता पाहता जीपचे दोन्ही चाक पुलाच्या खाली गेले. काही क्षणातच जीप नदीत कोसळली. नेमकी जीप कशी कोसळली हे आता सांगता येत नाही, असे अभिमान सतीमेश्राम म्हणाला. नदीपात्रात जीप पडताच चालकाने दार उघडले आणि उडी मारून पसार झाला. मी मात्र त्याच्याजवळच बसून होतो. वाचवा वाचवा असा आवाज ऐकून भानावर आलो आणि काही विचार न करता जखमींना बाहेर काढणे सुरू केले.