प्राथमिक शिक्षकाने कारची ॲम्बुलन्स करून काेराेना काळात दिली माेफत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 05:00 AM2021-09-05T05:00:00+5:302021-09-05T05:00:44+5:30
त्यांच्याकडे असलेल्या कारची त्यांनी ॲम्बुलन्स केली. ग्रामीण भागातील रुग्णांना निशुल्क भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत हाेते. तीन महिन्याच्या काळात त्यांनी जवळपास ५० काेराेनारुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कुणाकडूनही एक पैसाही घेतला नाही. डिझेल आणि चालकाचा खर्चही त्यांनी आपल्या पगारातून केला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागात शिक्षकाची नाेकरी करताना तेथील समस्या जवळून अनुभवताना काेराेना काळात रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी हाेणारे हाल एका शिक्षकाने अनुभवले. आपल्याला काय करता येईल, असा विचार करतानाच स्वत:ची कार ॲम्बुलन्समध्ये परावर्तीत करून तीन महिने रुग्णसेवा केली.
ग्रामीण भागातील काेराेना रुग्णांना कार कम ॲम्बुलन्समधून जिल्हास्तरावरच्या रुग्णालयात पाेहाेचविले तेही अगदी माेफत. चार महिने अहाेरात्र हा उपक्रम राबिवला. त्या काळात मास्क, सॅनिटायझरचे निशुल्क वितरण गावागावांत केले. निशिकांत बडवाईक असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव असून माेहाडी तालुक्यातील सकरला जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. आजही सामाजिक जाणिवेतून कुणाच्याही मदतीला धावून जातात. काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार उडाला हाेता. रुग्णालय हाऊसफुल्ल झाले हाेते.
ग्रामीण भागातून शहरापर्यंत रुग्णाला आणण्यासाठी माेठे पैसे माेजावे लागत हाेते. ही बाब संवेनशील मनाचे शिक्षक निशिकांत बडवाईक यांना दिसली. त्यातूनच प्रेरणा घेत त्यांच्याकडे असलेल्या कारची त्यांनी ॲम्बुलन्स केली. ग्रामीण भागातील रुग्णांना निशुल्क भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणत हाेते. तीन महिन्याच्या काळात त्यांनी जवळपास ५० काेराेनारुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कुणाकडूनही एक पैसाही घेतला नाही. डिझेल आणि चालकाचा खर्चही त्यांनी आपल्या पगारातून केला. याच काळात त्यांनी पदरमाेड करीत काेराेनाबाबत मार्गदर्शन करून मास्क आणि सॅनिटायझरचे वितरण केले.
शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असताे. शिक्षक हा संवेदनशील असल्याने समाजातील बऱ्यावाईट घटनांचे भान त्याच्या लवकर लक्षात येते. शाळेतून बाहेर आल्यावर ताे समाज शिक्षक असताे. याच जाणिवेतून काेराेना काळात निशिकांत बडवाईक यांनी रुग्णसेवा केली. शिक्षकदिनी भलेही त्यांना पुरस्कार मिळणार नाही, परंतु काेराेनारुग्ण रुग्णालयातून ठणठणीत बरा हाेऊन परत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पुरस्कारापेक्षाही माेठे आहे, असे निशिकांत बडवाईक सांगतात.
रुग्णाचा फाेन आला की कार ॲम्बुलन्स दारात
- निशिकांत बडवाईक सांगतात काेराेना काळात ग्रामीण भागातून कुणाचाही फाेन आला की, आपली कार ॲम्बुलन्स अवघ्या काही वेळात त्याच्या दारात उभी राहत हाेती. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतरच समाधान लाभत हाेते. या काळात स्वत:ची काळजी घेण्यासाठी आपण पीपीई कीट घेतली. चालकालाही याेग्य मार्गदर्शन केले. श्रीमंतांना सहज वाहन उपलब्ध हाेते. मात्र गाेरगरिबांचे काय या जाणिवेतून आपण ही सेवा केली. त्यात आपण माेठे काहीच केले नाही, असे विनम्रपणे निशिकांत बडवाईक सांगतात.