प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेला 23 जुलैची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:00 AM2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:13+5:30
या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, आदी बाबींकरिता नुकसानभरपाई देय आहे. योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ २३ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) सन २०२१-२२ राबविण्यास शासनाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे. भंडारा जिल्ह्याकरिता या योजनेअंतर्गत भात व सोयाबीन ही दोन अधिसूचित पिके आहेत. नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल. सध्याची परिस्थिती पावसाची अनियमितता लक्षात घेता पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, आदी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट, आदी बाबींकरिता नुकसानभरपाई देय आहे. योजनेअंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ २३ जुलै २०२१ पर्यंत देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) सन २०२१-२२ अंतर्गत धान व सोयाबीन दोन्ही पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ पर्यंत आहे. भंडारा जिल्ह्याकरिता एचडीएफसी इर्गो इन्सुरंस क. लि. मुंबई ही इन्सुरंस कंपनी निश्चित झालेली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत धान पीक (खरीप हंगाम) करिता शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रक्कम रुपये ७६० प्रति हेक्टर असून विमा संरक्षित रक्कम रुपये ३८,००० हजार रुपये प्रति हेक्टर आहे. तसेच सोयाबीन पीक (खरीप हंगाम)करिता विमा हप्त्याची रक्कम रुपये ५५० प्रति हेक्टर असून, विमा संरक्षित रक्कम रुपये २७,५०० प्रति हेक्टर आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अधिसूचित क्षेत्र, पिके, विमा हप्ता व योजनेच्या इतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून योजनेबाबत माहिती वेळोवळी शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. यासोबतच प्रत्येक तालुक्यात कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षांमार्फत मागर्दर्शन केले जात आहे.
पावसाच्या दडीमुळे पीक विम्याकडे वाढला कल
- जुलै महिना संपत आला तरी अद्यापही जोरदार पावसाला सुरुवात झाली नसल्याने जिल्ह्यात धान राेवणीची कामे रखडली आहेत. अवर्षणाची स्थिती असल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत ८० हजारांच्या आसपास शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे कल वाढला असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. पिकांची पेरणी न झाल्याने होणारे नुकसान, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड, पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूरक्षेत्र, जलमय होणे, भूस्खलन, आदी बाबींमध्ये उत्पादनात येणारी घट पीक विम्यासाठी ग्राह्य धरण्यात येते, अशा वेळी बळीराजाला पीकविम्याचा आधार मिळतो.
गतवर्षी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सन २०२१- २२ मध्ये प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत सहभाग होण्यासाठी शासनाने २३ जुलै २०२१ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन खरीप पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.
-हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.