शाळांमधील ध्वजारोहणाचा अधिकार मुख्याध्यापकांना
By admin | Published: January 24, 2017 12:33 AM2017-01-24T00:33:48+5:302017-01-24T00:33:48+5:30
नागपूर विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता लागलेली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र : पदवीधर मतदार संघ निवडणूक आचारसंहितेचा परिणाम
भंडारा : नागपूर विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक असल्याने आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण शाळास्तरावर मुख्याध्यापकांनी करावे, असे पत्र आज शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना बजावले आहे.
प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम स्थानिकस्तरावर ग्रामपंचायत सरपंच किंवा उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात येते. मात्र, यावर्षी नागपूर विभागात शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीची जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने खबरदारी घेतलेली आहे. दोन दिवसांवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण शाळास्तरावर मुख्याध्यापकांनी करावे, असे पत्र आज सोमवारला अभयसिंह परिहार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना बजावले आहे.
या पत्रात ध्वजारोहण समारंभात निवडणूक प्रचाराविषयी अथवा राजकीय स्वरूपाचे भाषण करता येणार नाही. सदर कार्यक्रम ध्वजसंहितेचे व आचारसंहितेचे पालन करून साजरा करण्यात यावा, यात हयगय होता कामा नये, असे झाल्यास संबंधीतांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावी अशा सुचना सर्व शाळांना करव्या असे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. शाळा व ग्रामपंचायत अतिथी ध्वजारोहणाचा मान सरपंचाला मिळत असल्याने अनेकदा भाषणामधून राजकीय द्वेषभावना निर्माण होत होत्या. या निर्णयामुळे मागील अनेक वर्षांनंतर ध्वजारोहणाचा मान आता मुख्याध्यापकांना मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)
आचारसंहितेमुळे सर्वत्र संभ्रमावस्था
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, असे निवडणूक आयोगाने फतवा बजावला आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण करण्याबाबत सर्वत्र संभ्रमावस्था आहे. अनेक ठिकाणी शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पत्रिका छापून निमंत्रितांना त्या वाटपही केलेल्या आहेत. दरम्यान शिक्षण विभागाने आज आचारसंहितेचा मुद्दा पुढे करून शाळास्तरावर ध्वजारोहण मुख्याध्यापकांनी करावे असे बजावले आहे. त्यामुळे आचारसंहिता कुणासाठी आहे किंवा कुणासाठी नाही, असा संभ्रम आता जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढारी, अधिकारी व सर्वसामान्यांसामोर उभा ठाकला आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागले असल्याने शिक्षणाधिकारी यांनी शाळांचे ध्वजारोहण मुख्याध्यापकांनी करावे असे पत्र आज काढले. याबाबत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी शिक्षणाधिकारी परिहार यांनी मला विश्वासात घेतले नाही व पत्र काढताना विचारणा केली नाही. विधानपरिषदेची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झालेली आहे. आहे, परंतू स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना या आचारसंहितेचे बंधन काही प्रमाणात असले तरी ध्वजारोहण समारंभ पदाधिकारीच करतील.
- जगन्नाथ भोर,
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.