ग्रामसभेच्या मंजूर यादीला प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:49+5:302021-02-06T05:06:49+5:30
सरपंच सेवा महासंघाची मागणी : खंडविकास अधिकारी यांना निवेदन चिचाळ : तालुक्यातील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर केलेली यादी व ...
सरपंच सेवा महासंघाची मागणी : खंडविकास अधिकारी यांना निवेदन
चिचाळ : तालुक्यातील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर केलेली यादी व पंचायत समितीने ग्रामपंचायतीला पाठविलेल्या यादीतील तफावत दूर करून ग्रामसभेच्या यादीला मान्यता द्यावी, अशा आशयाचे निवेदन खंडविकास अधिकारी तहसीलदार पवनी यांना सरपंच सेवा महासंघ पवनी तालुक्याच्या वतीने देण्यात आले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास सोमवार, ८ फेब्रुवारीला पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनात दिला आहे
पवनी तालुका अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेने ठरविलेल्या प्रपत्र ‘ड’च्या याद्या रीतसर पंचायत समितीला सुपूर्द केल्या; परंतु त्यापैकी सर्वच ग्रामपंचायतींच्या सर्वच लाभार्थ्यांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर प्रक्रिया तालुक्यात दोषपूर्ण आहे. ऑनलाइन झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्यांपैकी जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे. संदर्भीय पत्रानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला घोळ झालेला दिसून येत आहे.
प्रशासनाने यादीमध्ये केलेल्या घोळामुळे प्रत्येक गावातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. हा घोळपण सरपंचांनीच केला, असे खापर गावातील लोक सरपंचांवर फोडीत असल्याने गावातील पाणीपट्टी, घरपट्टी भरण्यास ग्रामस्थ नकार दर्शवित आहेत. तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंचांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
सदर घोळ दूर करून ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने मंजूर व पात्र म्हणून पाठविलेल्या यादीला पूर्ववत करण्यात यावे. वरिष्ठांना आपल्या स्तरावरून मार्गदर्शन म्हणून त्यांचे लेखी पत्र चार दिवसांत सर्व ग्रामपंचायतींस द्यावे. असे न केल्यास सोमवार, ८ फेब्रुवारीला सरपंच महासंघ पवनी तालुक्याच्या वतीने पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्यात येईल, असा इशारा खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना सरपंच सेवा महासंघ पवनी तालुका अध्यक्ष अनिता गिऱ्हेपुंजे, उपाध्यक्ष शरद तिघरे, सचिव डॉक्टर नूतन कुर्झेकर, जिल्हाध्यक्ष यादव मेघरे, जयश्री कुंभलकर, राजू तलमले, किशोर ब्राह्मणकर, अरविंद सुखदेवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोट
सरपंच सेवा महासंघ तालुका पवनीच्या वतीने दिलेल्या निवेदनावर शासनाने तत्काळ दखल घेऊन ग्रामसभेतून पाठविलेल्या यादीला मंजुरी द्यावी; अन्यथा सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती पवनी समोर संघटनेच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात येईल.
- अनिता गिऱ्हेपुंजे,
सरपंच सेवा महासंघ पवनी तालुका अध्यक्षा