सैनिक कुटुंबीयांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 12:28 AM2017-01-18T00:28:44+5:302017-01-18T00:28:44+5:30
अतिशय विषम परिस्थितीत सैनिक देशहिताच्या रक्षणासाठी लढत असतात.
जिल्हाधिकारी : ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ
भंडारा : अतिशय विषम परिस्थितीत सैनिक देशहिताच्या रक्षणासाठी लढत असतात. त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य असून सिमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटूंबियांचे प्रश्न व समस्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी प्राधान्याने सोडवाव्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन २०१६ निधी संकलन शुभारंभ आज आयोजित केला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, सहाय्यक जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी ध्वजनिधी देवून ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ केला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, मागील वर्षी ध्वजनिधीचे १०० टक्के पूर्ण केले आहे. यावर्षी सुध्दा उद्दिष्टय पूर्ण करण्यात येईल.
सैनिकांप्रती केवळ सदभावना न ठेवता जास्तीत जास्त ध्वजनिधी एकत्रित करुन कृतीच्या माध्यमातून आपली सैनिकांप्रती भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. भंडारा येथे सैनिक कॅन्टीनचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सैनिकांच्या कुटूंबियांच्या प्रश्नांची व समस्यांचे विभागनिहाय वर्गीकरण करुन सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी द्यावे, हे सगळे प्रश्न तातडीने सोडविले जातील.
जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू म्हणाल्या की, ध्वजदिन निधी हा सैनिकांच्या कल्याणासाठी वापरला जातो. या निमित्ताने आपणासर्वांना चागली संधी असून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी मोठया प्रमाणात गोळा केला जावा. यामुळे सैनिकांच्या बलिदानाची कर्तव्यातून जाणीव ठेवली असा संदेश समाजात जाईल. कार्यक्रमात उपस्थितांच्या हस्ते विरमाता, विरपत्नी यांचा गौरव करण्यात आला.
यात विरपत्नी उर्मिला तितरमारे, विरमाता सिताबाई माटे, जनाबाई मडामे व विमलबाई बनसोड यांचा समावेश आहे. सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात प्रियंका गायधने व परितोष बटराखाये यांचा समावेश आहे. सैनिकांच्या व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आर्थिक मदत यावेळी करण्यात आली. सुखदेव शेंडे, गिरधारी थोटे, अशोक गभणे, श्रीकृष्ण देवाडे, अशोक डोंगरवार, रविंद्र गायधनी, एस.बी. शहारे व ओम बहादूर सिंग यांना धनादेश देवून प्रोत्साहित करण्यात आले. ध्वजनिधी संकलनात उद्दिष्टय पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले. गेल्या वर्षी २४ लाखाचे उद्दिष्टय होते. ते पूर्ण केल्याचे लिमसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)