जलयुक्त शिवारच्या कामांना प्राधान्य द्या
By admin | Published: July 10, 2016 12:22 AM2016-07-10T00:22:53+5:302016-07-10T00:22:53+5:30
जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून भंडारा जिल्ह्यातील यंत्रणांनी जलयुक्त शिवारच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश...
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जलयुक्त शिवारच्या प्रगतीचा आढावा,२०१६-१७ चा आराखडा सादर करा
भंडारा : जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून भंडारा जिल्ह्यातील यंत्रणांनी जलयुक्त शिवारच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. २०१६-१७ च्या कामांचे आराखडे तात्काळ सादर करून निधी विहित वेळेत खर्च करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी जगन्नाथ भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.नलिनी भोयर यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी बैठकीत २०१५-१६ मधील ८३ गावातील जलयुक्त शिवारच्या कामांचा यंत्रणा व तालुका निहाय आढावा घेतला. २०१५-१६ मध्ये झालेल्या प्रत्येक कामाला उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देवून कामाची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वर्षातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावेत, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत २०१५-१६ ची सर्व यंत्रणेची गाव निहाय प्रस्तावित कामे, पूर्ण कामे तसेच अपूर्ण कामे, विशेष निधी व सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त निधी खर्च आणि शिल्लक निधी व त्यांची कारणे, यंत्रनिहाय १०० टक्के व ८० टक्के तसेच ५० पूर्ण झालेली गावे, पूर्ण केलेल्या कामांमुळे निर्माण झालेला पाणी साठा, जलयुक्त शिवार अभियान, तालुकास्तरीय समितीची १०० टक्के कामे झालेली गावे, यंत्रणांनी सिमनिकवर अपलोड केलेली कामे व भायाचित्रे, २०१६-१७ अंतर्गत भंडारा, तुमसर, मोहाडी व पवनी यांनी गाव आराखडे सादर करणे व मागेल त्याला शेततळे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांनी दर सोमवारी तालुकास्तरीय बैठक घेऊन कामांचा आढावा घ्यावा व या बैठकीचा अहवाल जिल्हा समितीला द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. अपूर्ण कामांना तसेच कंत्राटदारांनी जी कामे केली नाहीत, त्या कामांना तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेट देवून कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ज्या कंत्राटदारांनी कामे अर्धवट ठेवली किंवा सुरु केली नाही अशा कंत्राटदारांना नोटीस देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले. २०१६-१७ चे आराखडे तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात यावेत. जलयुक्त शिवार मधून एरिया ट्रिटमेंटची कामे करण्यात यावी असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व यंत्रणांनी प्रत्येक कामाचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात भंडारा जिल्ह्यातील ५९ गावाची निवड करण्यात आली आहे. या सर्व गावात प्रस्तावित कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीस अभियानातील यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)