आरोपीला दीड वर्षाचा कारावास
By admin | Published: October 9, 2015 01:21 AM2015-10-09T01:21:50+5:302015-10-09T01:21:50+5:30
दारु पिण्याच्या कारणावरून चाकुने हल्ला करणाऱ्या विकास उर्फ दुबली दलीराम गिलोरकर रा.कुंभारे वॉर्ड तुमसर याला न्यायालयाने दीड वर्षाचा ...
मारहाण प्रकरण : तुमसर तालुक्यातील झारली येथील घटना
भंडारा : दारु पिण्याच्या कारणावरून चाकुने हल्ला करणाऱ्या विकास उर्फ दुबली दलीराम गिलोरकर रा.कुंभारे वॉर्ड तुमसर याला न्यायालयाने दीड वर्षाचा कठोर कारवास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत असे की, शोभा देवानंद मडावी रा.झारली यांच्या घरी आरोपी विकास गिलोरकर (२६) रा.कुंभारे वॉर्ड तुमसर, त्याचा मित्र सुमित रोशन देशमुख (२०) रा.सिहोरा व देवीलाल भोला पटले (४२) रा.झारली हे तिघेही दारु पिण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या दारु पिण्याच्या कारणावरून वाद झाला. आरोपी विकास याने चाकू काढून देवीलाल पटले याला मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. ईश्वरदयाल पटले रा.झारली याने जखमीला दवाखान्यात दाखल केले. घटनेची तक्रार ईश्वरदयाल पटले यांनी तुमसर पोलिसात दाखल केली. पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर सदर प्रकरण प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांच्या न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षाने १० साक्षीदार तपासले. एक वर्षे दोन महिन्यात प्रकरणाचा निकाल लागला. न्यायाधीश अकर्ते यांनी विकास गिलोरकर याला दीड वर्ष सशक्त, कठोर कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास परत तीन महिन्याचा कठोर कारावासाचीही आदेशात तरतूद केली. तसेच दुसरा आरोपी सुमित देशमुख याला त्याचे बंदपत्र सहा महिनेपर्यंत वाढविण्याचा हुकुम देण्यात आला. विकास गिलोरकर यांनी विद्यमान न्यायालयात जमा केलेल्या पाच हजार रुपयांमधून ३०० रुपये जखमी देवीलाल पटले यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड.राजकुमार वाडीभस्मे यांनी काम पाहिले. (नगर प्रतिनिधी)