कारागृहातील झाडावर चढून कैद्याचा आत्महत्येचा इशारा; दीड तासांच्या प्रयत्नानंतर उतरविले खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2022 11:22 AM2022-10-20T11:22:54+5:302022-10-20T12:32:30+5:30

भंडारा येथील प्रकार

Prisoner threatens suicide by climbing on a tree at bhandara prison | कारागृहातील झाडावर चढून कैद्याचा आत्महत्येचा इशारा; दीड तासांच्या प्रयत्नानंतर उतरविले खाली

कारागृहातील झाडावर चढून कैद्याचा आत्महत्येचा इशारा; दीड तासांच्या प्रयत्नानंतर उतरविले खाली

Next

भंडारा : कारागृहातील पिंपळाच्या झाडावर चढून न्यायालयीन बंद्याने जोरजोराने ओरडून आत्महत्या करण्याचा इशारा देण्याचा प्रकार येथील जिल्हा कारागृहात मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. दीड तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले. याप्रकरणी भंडारा शहर ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक हेमराज सयाम (२०, रा.पलखेडा ता.गोरेगाव, जि. गोंदिया) असे न्यायालयीन बंद्याचे नाव आहे. तो १ जुलै २०१७ पासून भंडारा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. गोंदिया न्यायालयातील एका प्रकरणात त्याला जामीन मिळाला आहे. मात्र, मध्यप्रदेशातील बिलासपूर येथील चोरी प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला बिलासपूर कारागृहात पाठविले जाणार होते. त्यासाठी तो पोलीस गार्डची मागणी करत होता. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी दैनंदिन दिनचर्येकरिता बंद्यांना कारागृहातील आवारात आणले. त्यावेळी कारागृहातील पिंपळाच्या झाडावर दीपक सर्वांची नजर चुकवून चढला.

शेंड्यावर जाऊन बसून तेथून जोरजोराने ओरडू लागला. जोपर्यंत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कारागृहात भेटायला येणार नाही. मला बिलासपूरच्या केंद्रीय जेलमध्ये कायमस्वरूपी वर्ग करण्यासाठी पोलीस गार्ड मिळणार नाही तोपर्यंत मी झाडावरच राहणार, अन्यथा मी झाडावरून उडी मारून आत्महत्या करणार, अशी धमकी देत होता. हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या लक्षात येताच कारागृह अधीक्षक अमृत आगाशे यांच्यासह कारागृह कर्मचारी तेथे पोहोचले. त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले तसेच भंडारा शहर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. ठाणेदार सुभाष बारसे कारागृहात दाखल झाले. तब्बल दीड तासांच्या प्रयत्नानंतर तो खाली उतरला. याप्रकरणी भंडारा ठाण्यात कारागृह शिपाई हेमराज जसुदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भादंवि ३०९ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलासपूर कारागृहात रवाना

झाडावर चढून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या न्यायालयीन बंदी दीपक सयाम याला बुधवारी सकाळी ८ वाजता पोलीस गार्डच्या मदतीने बिलासपूरकडे रवाना करण्यात आले आहे. मात्र, झाडावर चढून त्याने आत्महत्येचा इशारा दिल्याने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

Web Title: Prisoner threatens suicide by climbing on a tree at bhandara prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.