रुग्णांच्या संख्येत घट होताच खासगी रुग्णालये बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:37 AM2021-05-21T04:37:03+5:302021-05-21T04:37:03+5:30
मार्च २०२१ पासून राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. त्यातच एप्रिल २०२१ मध्ये गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहावयास ...
मार्च २०२१ पासून राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली. त्यातच एप्रिल २०२१ मध्ये गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहावयास मिळाला. वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत चालला होता, तसेच रुग्णांमध्ये एकच धावपळ उडाली होती. या संधीचा लाभ घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील व्यावसायिक डॉक्टरांमध्येही शर्यत सुरू झाली. दरम्यान, एकामागे एक खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनाकडे साकडे टाकत, तसेच जनप्रतिनिधींच्या माध्यमातून धागेदोरे लावून कोविड रुग्णांवर उपचार करून घेण्याची परवानगी मिळवून घेतली. यामुळे गोंदिया जिल्ह्यात एक-एक करता १९ खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. १९ रुग्णालयांमध्ये जवळपास ६६३ पेक्षा अधिक बेड तयार करण्यात आले होते. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयेदेखील हाऊसफुल झाले. एवढेच नव्हे, तर रुग्णांना बेडअभावी घरीही परत जावे लागले.
मात्र, मे महिन्यापासून जिल्ह्यात संसर्गाचा वेग मंदावला आणि कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने क्रियाशील रुग्णांच्या संख्येत घट येऊ लागली. सद्य:स्थितीत १९ पैकी ८ रुग्णालये एकही बाधित रुग्ण उपचारार्थ दाखल नसल्यामुळे ते रुग्णालय कोविड सेवेच्या यादीतून बाद झाले आहे, तर उर्वरित ११ रुग्णालयांमध्ये फक्त १८० रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयातही ६० टक्के बेड रिकामे आहेत.