पटेल महाविद्यालयात बक्षीस वितरण सोहळा
By Admin | Published: April 10, 2016 12:30 AM2016-04-10T00:30:21+5:302016-04-10T00:30:21+5:30
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे विज्ञान मंडळ व प्राणिशास्त्र मंडळाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता.
विज्ञान शाखेचा उपक्रम : मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
साकोली : स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतर्फे विज्ञान मंडळ व प्राणिशास्त्र मंडळाचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एस.एन. मोर कॉलेज तुमसरचे प्राचार्य डॉ.चेतन मसराम हे होते. व अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.ए. धोतरे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अंकिता पूर्णिये हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. विज्ञान मंडळाचे प्रभारी डॉ.एल.पी. नागपुरकर यांनी प्रास्ताविक व विज्ञान मंडळाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे स्वरुप व त्यांचा आढावा सांगितला. डॉ. सी.जे. खुणे यांनी प्राणीशास्त्र मंडळाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे व उपक्रमांचा आढावा सांगितला.
डॉ.मसराम म्हणाले, विज्ञान शिक्षणाचे ग्लोबलायझेशन व आपल्या पुढील असलेली आव्हाने फार मोठी जरी असली तरी स्वत:मधील विविध कौशल्ये विकसित करावी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रातील शैक्षणिक व तांत्रिक कौशल्य आत्मसात करावी. कठोर परिश्रम व चोख तयारी असावी व वारंवार प्रयत्न केल्यास ते शक्य आहे.
प्राचार्य एस.ए. धोतरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विज्ञान मंडळ हे अतिशय सक्रियतेने अनेक उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या दृष्टीने कार्य करीत असते. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन जीवनात प्रगती करावी व विविध कलागुणांचा विकास करावा, महाविद्यालयातर्फे नेहमीच सहकार्याची भूमिका राहील, असे प्रतिपादित केले.
बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना पोस्टर स्पर्धेची १० बक्षिसे, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ६ बक्षिसे व सेमीनार स्पर्धेची १२ बक्षिसे पाहुण्यांच्या हस्ते वितरित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
पोस्टर स्पर्धेत प्रथम ज्योत्स्ना परशुरामकर, द्वितीय रोशनी गडारिया व प्रणोती बारसागडे, तृतीय भाग्यश्री पटले व रिया बोदेले, सेमीनार स्पर्धेत प्रथम अंकिता पूर्णिये, द्वितीय नेहा हटवार व विक्की गणवीर, तृतीय भारती गुरनानी व अक्षय खेडीकर यांना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे पदवी परीक्षेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमात शैक्षणिक योगदान व इतर क्षेत्रातील प्रावीण्यपूर्ण वाटचालीबाबत विज्ञान शाखेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून अंकीता पूर्णीये, श्रद्धा कापगते, अदिती जैन व प्रणोती जैन या बीएसस्सी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच प्राणिशास्त्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या भित्तीचित्र व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षिसे प्रदान करण्यात आले.
संचालन अंकिता पूर्णिये व अदिती जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन भारती गुरनानी हिने केले. कार्यक्रमासाठी डॉ.से.जे. खुणे, डॉ.अशोक चुटे, डॉ.एफ.एम. निर्वाण, प्रा.राजीव मेश्राम, प्रा.अमीत जगीया, प्रा.धार्मिक गणवीर, एम.बी. राऊत, महेश शहारे, अक्षय राऊत, दीपाली पटले, नेहा हटवार यांनी सहकार्य केले.
(तालुका प्रतिनिधी)