स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या मार्गी लावणार
By admin | Published: November 21, 2015 12:35 AM2015-11-21T00:35:52+5:302015-11-21T00:35:52+5:30
स्वस्त धान्य दुकानदार हा अतिअल्प कमिशनवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करीत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम चरण वाघमारे यांचे आश्वासन
तुमसर : स्वस्त धान्य दुकानदार हा अतिअल्प कमिशनवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना अनेक समस्यांना व प्रसंगी नागरिकांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नानाविध समस्यांचा डोंगर त्यांच्यावर कोसळला असून स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे. असे आश्वासन तुमसर विधानसभेचे आमदार चरण वाघमारे यांनी दिले.
स्थानिक सिंधी धर्मशाळेत आयोजित स्वस्त धान्य दुकानदार संघाच्या दिवाळी मिलन समारंभात ते बोलत होते. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती राजकुमार माटे, संचालक अरविंद कारेमोरे, रामदयाल पारधी, रमेश ईखार, मयुरध्वज गौतम, गुरूदेव भोंडे, शालिकराम गौरकर, घनश्याम बोंदरे, मुरलीधर वासनिक, भाऊराव चौरीवार, गुलराज कुंदवानी, भुपत सार्वे, कुसूम कांबळे, श्यामराव तुरकर, सुनिता कावळे, भाग्यश्री चामट, डॉ. चिंतामन मेश्राम उपस्थित होते.
वाघमारे म्हणाले, भविष्यात तुमसर-मोहाडी तसेच वरठी येथील गोडावून म्हणून धान्य दुकानदारांना मिळणारा माल हा वजनानुसारच मिळेल, याकडे कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. गोडावूनमधून मिळणाऱ्या धान्याचे वजन कमी आढळून आल्यास व्यवस्थापकावर कारवाई केली जाणार आहे. वर्तमान स्थितीत दुकानदारांना गोडावून मधून मिळणाऱ्या ५० किलोच्या कटट्यात ३ ते ५ किलोग्रॅम धान्य कमी मिळते. परिणामी दुकानदाराला नाहक ग्राहकांच्या रोषाला बळी पडावे लागते. असेही त्यांनी म्हटले. प्रास्ताविक स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी केले. त्यांनी दुकानदारांच्या विविध अडचणी अतिथींंना अवगत करून देत शासनाने घरपोच धान्यसाठा ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे दुकानदारांना मिळणारे भाडे किरायाही बंद होणार आहे. एक तर अतिअल्प कमिशन त्यात आता किराया भाडे ही बंद होणार असल्याने दुकानदारांचे कंबरडे मोडल्या गेले आहे. अन्न धान्य पुरवठा मंत्री गिरिष बापट जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताच निवेदन देणार असल्याचे सांगितले. संचालन बाजार समितीचे संचालक अरविंद कारेमोरे यांनी केले तर आभार स्वस्त धान्य दुकानदार तथा भाजपा सचिव प्रमोद घरडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)