‘एमपीएससी’ परीक्षार्थ्यांपुढे परीक्षा केंद्राचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:08 PM2020-08-06T12:08:04+5:302020-08-06T12:10:20+5:30
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई - पुण्यात क्लासेससाठी गेलेले शेकडो विद्यार्थी लॉकडाऊनमुळे आपल्या मुळ गाव परत आले. परिस्थिती पूर्व पदावर कधी येणार सांगणे कठीण आहे. अशातच राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. आपल्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्ष केंद्र निवडण्याची मुभा द्यावी अशी मागणी होत आहे.
विदर्भातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या ठिकाणी जाता. भंडारा जिल्ह्यातूनही शेकडो विद्यार्थी महानगरात गेले आहेत. तेथे महागडे क्लासेस लावून किरायाच्या खोल्याही घेतल्या. सुस्थितीत अभ्यास सुरु असताना कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाला. आता तर संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरात गेलेले प्रत्येक जण आता आपल्या मुळ गावी आले आहेत. गावात येवून त्यांनी आपला अभ्यास आॅनलाईन पद्धतीने सुरू ठेवला. अशातच राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. मुंबई-पुण्यात असताना या परीक्षार्थ्यांनी तेथीलच परीक्षा केंद्र निवडले होते.
मात्र लॉकडाऊनमुळे ही मंडळी आता गावात आली. परीक्षेला जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या भाड्याच्या खोल्याही सोडल्या आहेत. अशा स्थितीत भंडारा, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांना मुंबई अथवा पुण्याच्या परीक्षा केंद्रावर जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण गरीब होतकरू विद्यार्थी अडचणीत सापडले आहे. आपण केलेली मेहनत वाया तर जाणार नाही ना असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
आता परीक्षेसाठी केवळ ४० दिवस उरले आहेत. एकट्या भंडारा जिल्ह्यातील जवळपास दोन हजार विद्यार्थी यामुळे संकटात आले आहेत. मुळ गावी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याचे ठिकाण परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची मुभा द्यावी, त्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
ऑनलाईन पद्धतीने बदल शक्य
राज्य लोकसेवा आयोगाची अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात बदल करणे सहज शक्य आहे. भंडारा जिल्ह्यासाठी सहा उपकेंद्रावर २११७ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र म्हणून निवड केली आहे. या ठिकाणी १३ उपकेंद्रावर ३८४० परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतील अशी क्षमता आहे. अशीच स्थिती इतरही जिल्ह्याची आहे. त्यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना सोयीचे होईल असे परीक्षा केंद्र लॉकडाऊन काळात द्यावे अशी मागणी आहे.
अनेक विद्यार्थी महानगरात कोचिंगसाठी गेले होते. परंतु आता ते परत आले आहेत. त्यांच्यापुढे परीक्षेला जाण्याचा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी आपण एमपीएससीशी पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री, उच्चतंत्र शिक्षणमंत्री यांच्यासह एमपीएससीच्या अध्यक्षांनाही निवेदन पाठविले आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा.
- उमेश कोर्राम, अध्यक्ष स्टुडंटस् राईटस् असोसिएशन ऑफ इंडिया