डोंगरगावात समस्याच समस्या
By Admin | Published: June 19, 2016 12:23 AM2016-06-19T00:23:10+5:302016-06-19T00:23:10+5:30
गोलेवाडी गटग्रामपंचायतीत समावेश असलेल्या डोंगरगाव येथे समस्याच समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
गट ग्रामपंचायतीचा फटका : ना पावसाचा ठाव, ना स्वच्छतेचा ठिकाणा, पाणीटंचाईची झळ
विशाल रणदिवे अड्याळ
गोलेवाडी गटग्रामपंचायतीत समावेश असलेल्या डोंगरगाव येथे समस्याच समस्या निर्माण झाल्या असल्या तरी त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. मूलभूत सुविधा सोडविण्यात अकार्यक्षम प्रणालीचा वापर होत असल्याने डोंगरगाव येथील ग्रामस्थांशी भेदभाव होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
अड्याळ येथून सहा कि़मी. अंतरावर ४०० लोकसंख्या असलेल्या डोंगरगावात एकूण तीन बोरवेल आहेत. त्यापैकी एका बोरवेलला पाण्याचा अल्प पुरवठा होत आहे. दुसऱ्या बोरवेलची पाणीपुरवठा करण्याची क्षमता उत्तम असली तरी ती दूर अंतरावर आहे. त्यामुळे एका टोकावरून दुसऱ्या टोकावर पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांची निराशा दिसून येते.
तिसऱ्या बोरवेलमध्ये तांत्रिक बिघाड आहे. त्यामुळे या बोरवेलवर खर्च करण्यात आलेली रक्कम पाण्यात गेल्याची ओरड आहे. डोंगरगाव येथे २० दिवसापुर्वी नाल्यातील गाळ उपसा करण्यात आला. परंतु कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर लावण्यात आली नाही. परिणामी कचरा पुन्हा नालीत साचलेला आहे. नळधारकांना केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी भांडणे होणे नित्याचे झाले आहे. ग्रामपंचायतीत डोंगरगावाचा समावेश असला तरी या ग्रामपंचायतीमध्ये डोंगरगावचा एकही पदाधिकारी नाही. पदाधिकारी नसल्यामुळे समस्यांचा अंबार गावात दिसून येतो, अशी ओरड डोंगरगाववासी करीत आहे. समस्या बघण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात यावे. नागरिकांची समस्या जाणावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.